Year 2020 Taught To Boost Immunity To Fight Against Coronavirus And Similar Diseases


कोरोना काळ सुरु झाल्यापासून सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक जनजागृती झाली आहे. ती म्हणजे कोरोना हा संसर्जन्य आजर होऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येकानेच स्वतःची प्रतिकारशक्ती योग्य ठेवली पाहिजे. अनेक वैद्यकीय तज्ञांनी याबाबत भाष्य केले आहे. प्रतिकारशक्ती योग्य ठेवणे म्हणजे हा प्रतिबंधात्मक उपाय. यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. ज्या पद्धतीने कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजविला होता आणि त्यामुळे नागरिक ज्या वेगात आजरी पडत होते आणि मृत्युमुखी पडत होते, या भीतीने नागरिकांनी हा आजार होऊ नये आणि प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून भूतलावर जे काही मार्ग आहे त्याचा अवलंब या काळात केला. कधीही आयुष्यात ‘काढा’ या गोष्टीकडे ढुंकूनही न बघणारे, त्याच्या नावाने तोंड वाकडे करणारे अवलिया मात्र या काळात हाच काढा अनेक दिवस रिचवताना पाहायला मिळाले. व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा जो खप अंदाजे गेल्या दहा वर्षात झाला नसेल एवढा व्यवसाय त्याचा या एका वर्षात झाला असावा. या काळात या गोळ्यांचा भडिमार इतका झाला की बहुतांश व्हिटॅमिनच्या गोळ्या खाताना दिसत होते. सध्या तर कोणत्याही दूरचित्र वाहिनीवर आणि वृत्तपत्रात ज्या काही जाहिराती झळकत त्यात सगळ्यात जास्त जाहिराती ह्या प्रतिकारशक्ती वाढीच्या उत्पादनाच्याच आहेत. 2020हे संपूर्ण वर्ष नागरिकांनी प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल याभोवती घालवले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

शरीर पिळदार करण्यापेक्षा रोज व्यायाम केला पाहिजे, त्यासाठी जिमला न जात घरच्या घरी उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. योग करण्याचा धडका जोरदार सुरु होता. याबाबत मोठी जनजागृती या वर्षात झाली. अनेकजण एकमेकांना व्यायामाचे आणि योग शास्त्राचे  महत्त्व पटवून देताना दिसत होता. कोरोनाच्या या आजाराची दहशत एवढी मोठी होती की कुणीही या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी जे काही खायला सांगत होता, नागरिक या काळात खायला तयार झाले होते. घसा आणि फुफ्फुस व्यस्थित राहण्यासाठी ज्या पद्धतीने या संपूर्ण काळात गरम वाफ घेतली त्याला तर तोडच नव्हती. गरम वाफ घेण्याचे बाजारात जे उपकरण होते त्याचा भाव या काळात भलताच वधारलेला दिसला. बहुतांश नागरिकांच्या घरात एक छोटेखानी मेडिकल स्टोअर्स या काळात निर्माण झाले होते. त्यामध्ये ‘ओव्हर द  काऊंटर’वर मिळणाऱ्या गोळ्यांसोबत डॉक्टरांनी दिलेली औषधं, अंगदुखी, ताप, खोकला, सर्दी झाली तर लागणाऱ्या औषधांसोबत व्हिटॅमिनच्या गोळ्यांनी यामध्ये जागा घेतली होती. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पावडरचे डबे अनेकांच्या घरी सर्रास दिसत होते. यामध्ये विविध पॅथीची औषधे होती. काही पॅथीची सार्वजनिक औषधे वाटण्याचा कार्यक्रम काही राजकीय पक्षांनी घेतला. गल्ली-वस्त्यात घरोघरी ही औषधे देण्यात येत होती. हे सगळं चाललं होतं कोरोना होऊ नये म्हणून आणि आपली प्रतिकारशक्ति चांगली राहावी म्हणून.

इंडिया डाएटिक असोसिएशनच्या उपाध्यक्षा डॉ शिल्पा जोशी याबाबत अधिक माहिती देताना सांगतात की, “खरंय, या काळात अनेकांनी प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून विविध उपाय केले आहेत. मात्र आपल्याकडची अवस्था ‘पी हळद आणि हो गोरी’ या म्हणीसारखी झाली आहे. प्रतिकारशक्ती अशी काही लगेच वाढत नाही. ती एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती ही त्या व्यक्तीच्या शरीररचनेप्रमाणे वाढत असते. त्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणारी उत्पादने घेतलीच पाहिजे असे नाही. ज्या नागरिकाचा आहार संतुलित आहे आणि नियमित व्यायाम आहे अशा नागरिकांची प्रतिकारशक्ती ही वाढत असते आणि ती वाढविण्यासाठी या दोन गोष्टी पुरेशा आहेत. वैद्यकीय कारणांसाठी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या व्हिटॅमिन्स ती त्यांनी लिहून दिलेल्या काळासाठी खाणे योग्य. मात्र स्वतःच्या डोक्याने बाजारात काही गोष्टी मिळत आहे म्हणून खाणे सयुंक्तिक नाही. घरचे योग्य जेवण हा उपाय यासगळ्यांपेक्षा चांगला आहे.”      प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या या वेडापायी नागरिक विविध गोष्टी खात आणि पित आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. अति सेवनाने शारीरिक धोके निर्माण होऊ शकतात याचा साधं विचारही त्यांच्या मनात येत नाही. या प्रकरणी मानसोपचार तज्ञ डॉ सागर मुंदडा सांगतात की, “नागरिकांमध्ये नक्कीच या आजराची भीती आहे. त्यामुळे सतर्क राहायच्या मानसिकतेतून हा प्रकार होत आहे आणि ते खरं वास्तवही आहे. कारण कोरोनाच्या या संकटामुळे नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याची मानसिकता बळावली आहे. त्यात वाईट काही नाही. मात्र या सर्व प्रकाच्या गोळ्या किंवा पावडर खाताना आणि पिताना वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणातच घेतल्या पाहिजे. आपल्या जेवढे जास्त तेवढे अधिक चांगली ही वृत्ती असते ती मात्र धोकादायक ठरु शकते. काही 5-10 टक्के नागरिकांना तर या काळात मानसिक आजार झाला आहे, त्यांना कायम वाटत असते की आता आपल्या कोरोना होईल आणि आपण मरु. असे काही नागरिक आमच्याकडे सध्या उपचार घेत आहेत, आणि योग्य उपचार घेतल्याने त्यांना बरे सुद्धा वाटत आहे.

“अनेक नागरिक असे होते कि जे विविध प्रकारचे काढे, व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि वाफ घेत होते. मात्र अशा व्यक्तींना सुद्धा कोरोनाच संसर्ग झालेला पहिला आहे आणि त्यानंतर त्यांचा भ्रमनिरास होतो. प्रतिकारशक्ती अशी गोळ्यांनी खाऊन निर्माण होत नाही. एखाद्या व्यक्तीला जेव्हा संसर्ग झालेला असतो त्याला व्हिटॅमिनचा फायदा तो रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. मात्र प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित संतुलित आहार, व्यायाम आणि नियमित विश्रांती यामधून प्रतिकारशक्ती तयार होत असते. प्रतिकारशक्ती लसीतून मिळते. ती लवकरच येणे अपेक्षित आहे. जर कोरोना होऊ द्यायचा नसेल तर शासनाने काही सुरक्षिततेचे नियम आखून दिले आहेत त्याचे पालन केले पाहिजे.” असे डॉ अविनाश भोंडवे सांगतात. ते राज्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संस्थेचे राज्याचे अध्यक्ष आहेत.

Coronavirus | कोरोनाचे बदलते प्रकार लसीचा प्रभाव कमी करणार नाहीत- आरोग्य मंत्रालय

या सगळ्या कोरोना काळात आरोग्य साक्षरतेच्या पर्वाला सुरुवात झाली म्हणण्यास हरकत नाही. नागरिक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आहे हे सुखावह चित्र आहे. मात्र तज्ञांनी सांगितलेली प्रमाणित अशी योग्य प्रमाणात औषधे घेणे ही सुद्धा नागरिकांची जबाबदारी आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चांगला आहार आणि व्यायामाची गरज आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भीतीपोटी एखादी गोष्ट करण्यापेक्षा नागरिकांनी नियमित योग केले तर आयुष्यभरासाठी प्रकृती उत्तम राहण्यास मदत होणार आहे. वर्षभर आरोग्यसाठी घेणारी काळजी यापुढेही तशीच कायम ठेवली तर कोणत्याही आजारपासून दूर राहण्यास हातभार लागणार आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यात हे वर्ष गेलं असलं तरी त्याचे फायदे आणि तोटे लक्षात घेऊन यापुढे अशा पद्धतीने सगळ्याना एकत्र घेऊन आरोग्यासाठी चळवळ तयार  करण्याची गरज आहे, ज्या आरोग्य चळवळीतून नागरिकांना चांगल्या आरोग्यसाठी योग्य प्रबोधन मिळू शकेल.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *