ssc hsc exam 20201: दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर – ssc hsc exam 2021 tentative schedule of exam declared by board


हायलाइट्स:

  • दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
  • बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत
  • दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच परीक्षा फेब्रुवारी-मार्चऐवजी एप्रिल-मे या कालावधीत होईल.

करोना व लॉकडाउनमुळे बारावी व दहावी परीक्षांच्या निकालास विलंब झाला. लॉकडाउनमुळे १० महिन्यांहून अधिक काळ शाळा, महाविद्यालये बंद होती. परिणामी २०२१ मधील परीक्षा एप्रिल-मे या कालावधीत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यानंतर विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. दरम्यानच्या काळात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. यानंतर आता राज्य मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, या हेतूने; तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असून, विद्यार्थ्यांनी याच वेळापत्रकाचा आधार घ्यावा. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व अन्य परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा व महाविद्यालयांना कळवले जाईल, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

अकरा महिन्यांनी गजबजली राज्यातील महाविद्यालये

हरकती, सूचना पाठवा

‘दहावी व बारावीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत काही हरकती, सूचना असल्यास त्या राज्य अथवा विभागीय मंडळाकडे २२ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात पाठवाव्यात,’ असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळवले आहे.

CBSE बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सांगितले नियम… कोणते ते जाणून घ्या

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *