self-absorbed students: शिक्षण थांबले, हिंसा वाढली – self-absorbed students became violent during the corona period


म.टा. प्रतिनिधी, नागपूर

करोनामुळे सामान्यांची दैना झालेली असताना एक वेगळीच समस्या पुढे येत आहे. विशेष मुलांमध्ये येणाऱ्या स्वमग्न विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णत: थांबलेले आहे. या काळात काही मुले हिंसक झाली असून त्यांना सांभाळणेदखील पालकांना कठीण होऊन बसल्याचे चित्र आहे.

मेंदूतील दोषामुळे मुलांमध्ये स्वमग्नता (ऑटिझम) ही व्याधी जडते. अशा बालकांसाठी शहरात काही विशेष शाळा आहेत. तिथे त्यांना समजून घेत, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर लक्ष दिले जाते. परंतु, करोनामुळे सध्या या मुलांना आणि त्यांच्या पालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शाळा बंद असल्याने मुलांचे शिक्षण बंद झाले आहे. या प्रकारच्या मुलांना ऑनलाइन शिकविणे शक्य नाही. त्यांना जवळ घेऊन, समजावून सांगत प्रत्यक्ष शिकवावे लागते. परंतु, संक्रमणाच्या वाढत्या गतीमुळे मुलांना शाळेत पाठविण्यास पालक तयार नाहीत. त्यातल्या ‘हायपर’ वर्गवारीतील मुलांना शाळेत पाठविणे धोक्याचे आहे. अशा स्थितीत आता केवळ शारीरिक प्रात्यक्षिक, अॅक्टिव्हिटीजवर भर देऊन मुलांना गुंतवून ठेवण्यात येत आहे. त्यासाठी पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिजिकल अॅक्टिव्हिटीचे व्हिडीओ पाठविण्यात येतात. ते पाहून पालक मुलांकडून अॅक्टिव्हिटी करवून घेतात. अशाप्रकारे वर्षभरापासून विद्यार्थ्यांना सांभाळले जात आहे. सद्य:स्थितीत चाळीसपैकी केवळ आठ मुलांना प्रत्यक्ष पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे करोनामुळे प्रचंड नुकसान झाले आहे, अशी माहिती संवेदना स्वमग्न मुलांची शाळेच्या संचालिका ज्योती फडके यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

पूर्वपदावर आणणे कसरतच…

बहुतांश स्वमग्न मुलांना गाडीवरून बाहेर फिरायला आवडते. अशावेळी पोलिसांचा त्रास होतो. त्यांना मुलगा-मुलगी स्वमग्न असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवावे लागते. बरेचदा रात्री मुलांना बाहेर जाण्याची इच्छा होते. त्यावेळीसुद्धा अशा समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा पालकांचा अनुभव आहे. मुख्य म्हणजे, घरातल्या घरात मुले चिडचिडी, हिंसक झाली आहेत. त्याचा सामना पालकांना करावा लागतोय. हे सर्व पूर्वपदावर आणणे मोठी कसरत असेल, अशी भावना पालक आणि शिक्षक व्यक्त करताहेत.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *