schools in pune: करोनाबाधित रुग्णसंख्या वाढ: पुण्यातील शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद – schools closed till 28 february in pune due to increase in covid cases


म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी सहा या कालावधीत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व माध्यमांच्या सर्व शाळा, तसेच महाविद्यालये ही २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. हॉटेल आणि बार रात्री ११ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. मात्र, जिल्हांतर्गत प्रवासी वाहतुकीवर कोणतेही निर्बंध लावण्यात आले नसून, जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे.

पुणे आणि परिसरात करोनाबाधितांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करोनाबाबतच्या सद्यस्थितीचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला. त्या वेळी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

राव म्हणाले, ‘रुग्णसंख्येमध्ये पुणे राज्यात १२व्या क्रमांकावर आहे. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण साडेचार ते पाच टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सोमवारी मध्यरात्रीपासून रात्री ११ ते सकाळी सहा या कालावधीत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालये ही २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत; पण पूर्वीप्रमाणे ऑनलाइन स्वरूपात वर्ग सुरू राहतील.’

‘संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. दैनंदिन व्यापारावर परिणाम होऊ नये, यासाठी व्यापारी आणि हॉटेलचालकांबरोबर सोमवारी बैठक घेतली जाणार आहे; तसेच येत्या शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री पवार पुन्हा आढावा घेणार असून, त्यानंतर शाळा आणि महाविद्यालये सुरू करायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे,’ असे राव यांनी स्पष्ट केले.

भारतातील ५० टक्के पदवीधरही नोकरी मिळवण्यास पात्र नाहीत!

अन्य महत्त्वाचे निर्णय

– मायक्रो कंटेन्मेंट झोन केले जाणार.

– कोव्हिड केअर सेंटर होणार सुरू.

– आवश्यकता भासल्यास जम्बो सेंटरही सुरू करणार.

– स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी असलेल्या अभ्यासिका ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार.

– खासगी कोचिंग क्लास बंद

दहावीची परीक्षा ऑनलाइन? वाढत्याकरोना प्रादुर्भावामुळे चर्चांना उधाण

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *