Schools in Mumbai to remain shut till December 31 – Mumbai School Reopening: मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार


school reopening 2020: मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत उघडणार नाहीत. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोविड -१९ संक्रमणाची स्थिती मुंबईत सध्या नियंत्रणात असली तरी दिवाळीत लोकांचे मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडणे, प्रवास करणे या पार्श्वभूमीवर तसेच दिल्लीतील करोनाची लाट पाहून खबरदारी म्हणून शाळा तूर्त सुरू न करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतला आहे.

याबाबत चहल यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कोविड -१९ संसर्गाची आजची मुंबईतली स्थिती समाधानकारक आहे. रेट ऑफ इन्फेक्शन ०.२ टक्के आहे. हे मार्च महिन्यापासूनचा सर्वाधिक कमी प्रमाण आहे. करोना हे एक युद्धच आहे. हे युद्ध लवकर संपणारं नाही. त्यासाठी अजून काही अवधी लागणार आहे. म्हणूनच आम्ही जे प्लानिंग करत आहोत ते जास्तीत जास्त चांगल्या स्थितीसाठी करत आहोत. आणि दुसरीकडे वाईटातल्या वाईट स्थितीला सक्षमपणे सामोरे जाण्याची आम्ही तयारीदेखील करत आहोत. म्हणूनच देशातील करोनाग्रस्तांची वाढत असलेली संख्या पाहून तसेच दिल्लीतील परिस्थिती पाहून तूर्त मुंबई पालिका हद्दीतील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’

चहल म्हणाले की दिवाळीत लोकांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत, प्रवास वाढला आहे. लोकांनी रस्त्यांवर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यामुळे पुढचे ३-४ आठवडे काळजीचे आहेत. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून अजून काही कालावधीसाठी शाळा प्रत्यक्ष सुरू न करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. शिवाय करोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका देखील नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने शाळा सुरू करणार नाही.

शाळा सुरु होणार की नाही…शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

स्थानिक प्रशासनाने घ्यावा निर्णय

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधील नववी ते अकरावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

मुलांना शाळेत पाठवणे योग्य आहे का?; साशंक पालकांचे डॉक्टरांना फोन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: