Sambhaji Bhide stated people who die due to corona are not competent to live | Sambhaji Bhide


सांगली : “मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत. तो XX (आक्षेपार्ह शब्द) प्रवृत्तीच्या लोकांना होतो, तो मानसिक आजार आहे,” असं अजब वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. तसंच कोरोना निर्बंधांवरुन त्यांनी राज्य सरकारवर गंभीर टीकाही केली आहे. सामान्य नागरिकांनी सरकारविरोधात बंड करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

संभाजी भिडे म्हणाले की, “समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे. मात्र शासन हे दुशासन होता कामा नये, निव्वळ मूर्खपणा सुरु आहे. शासनाचे निर्णय घातकी आहेत. संसार आणि व्यापारी माती मोल झाले. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही.”

“लॉकडाऊनमध्ये खासदार आणि आमदारांचे पगार सुरू आहेत, त्यांचे पगार परत घेऊन, सरकारी खजिन्यात जमा करावेत. सामान्य माणसांची उपासमार सुरु आहे. त्यामुळे लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. सामान्य माणसांचा विचार नसलेले राज्यकर्ते राज्यापासून संपूर्ण देशात आहेत, असलं सरकार फेकून दिल पाहिजे,” असंही संभाजी भिडे म्हणाले.

“कोरोना हा रोगच नाही, तो XX (आक्षेपार्ह शब्द) प्रवृत्तीच्या लोकांना होतो, तो मानसिक आजार आहे. दारु दुकाने उघडी आणि भाजी विकणाऱ्यांना पोलीस काठ्या मारतात,” असं भिडे गुरुजी म्हणाले.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकारही जबाबदार आहे. कोरोनाच्या बाबतीत देशात खेळखंडोबा चालू आहे, जे जगायचे ते जगातील जे मरायचे ते मरतील, असं असंवेदनशील वक्तव्य त्यांनी केलं. तसंच मिलिट्रीला आपण काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का? असा सवाल त्यांनी विचारला.

संभाजी भिडेंनी शिवसेना आमदाराला मास्क काढायला लावला होता
याआधी संभाजी भिडे यांनी मागील वर्षी कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन केलं होतं. सांगली जिल्ह्यातील खानापूर  तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तोंडावर लावलेला मास्क त्यांनी काढायला लावला. यावेळी इतर कार्यकर्ते देखील विना मास्क आढळून आले होते.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *