pune university : पुणे विद्यापीठ: तांत्रिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण शेरा – some students get absent mark in final year exam results of pune university


म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असतानाच, काही विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे अनुत्तीर्ण झाल्याची तक्रार विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेला उपस्थित होते, मात्र निकालात अनुपस्थित शेरा; तसेच शून्य गुण आल्याने, अनुत्तीर्ण व्हावे लागले, अशा तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे आता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची परीक्षा १२ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेतली. तर, या परीक्षेत तांत्रिक समस्या उद्भवल्याने; तसेच ऐनवेळी अडचणी आल्याने परीक्षा न देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत घेतली. त्यानंतर विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यास, सुरुवात केली आहे. या निकालात सरासरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचर प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहे. अनेक विद्यार्थ्यांना कठीण विषयांमध्ये चांगले गुण मिळाले आहे, तर काही विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले आहे. अशी परिस्थिती असली, तरी काही विद्यार्थी तांत्रिक अडचणींमुळे अनुत्तीर्ण झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना काही विषयांत शून्य गुण मिळाले आहेत, तर काहींनी परीक्षा देऊनही त्या विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवले आहे. त्याचप्रमाणे परीक्षेत खूप कमी गुण मिळाल्याने, अनुत्तीर्ण निकाल आल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणींचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने लक्ष देऊन हेल्पलाइन, गूगल फॉर्मद्वारे संबधित विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊन योग्य कार्यवाही करावी. तांत्रिक व इतर अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी युवक क्रांती दलाचे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे आणि स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्डचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केली आहे.

विनाकारण तक्रारी नको अन्यथा…


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत अडचणी आलेल्या; तसेच समस्या उद्भवल्यामुळे परीक्षा देता न येणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत फेरपरीक्षेची संधी देण्यात आली होती. याचा फायदा देखील विद्यार्थ्यांनी घेउन समाधान व्यक्त केले. मात्र, काही विद्यार्थी जाणीवपूर्वक परीक्षा आणि निकालाच्या प्रक्रियेत अडथळे येण्यासाठी तक्रारी करीत आहेत. यातील काही विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षेतील माहिती तपासली असता, तक्रारींमध्ये तथ्य़ नसल्याचे समोर आले आहे. अनुत्तीर्ण झाले किंवा कमी गुण मिळाले म्हणून विद्यापीठ प्रशासनाला वेठीस धरल्यास, संबंधितांवर ऑनलाइन रेकॉर्डच्या आधारे कारवाई करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सांगण्यात आले.

मुंबई विद्यापीठ एमकॉम, बीकॉम, बीए निकाल जाहीरLeave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: