मुंबई : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. महाराष्ट्रानंतर दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेशसह काही राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी वर्च्युअली संवाद साधला. यावेळी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येणार आहे. मात्र, लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

चाचण्यांचा वेग चांगला
महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आजच्या सादरीकरणात सांगितले. राज्यात एकूण चाचण्यात 71 टक्के आरटीपीसीआर आणि 28 टक्के अँटिजेन होतात जे की समाधानकरक असले तरी वाढवावे असे केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्ष सव्वा वर्षांपासून आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कोविडची लढाई लढतो आहोत. मधल्या काळात तर संसर्गाची लाट थोपविण्यात आपल्याला यशही आले होते. महाराष्ट्रात तर आधी तीन हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली होती. मात्र, ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ यांच्या आयोजनाने साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला व कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असेच होत होते. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना आरटीपीसीआर चाचण्या 70 टक्यांपेक्षा जास्त करुन व लसीकरण आणखी जास्त गतीने वाढवू असे सांगितले. मात्र, त्यासाठी त्यांनी केंद्राचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

मागणीनुसार लस पुरवठा लगेच व्हावा
मुख्यमंत्री म्हणाले की, प्राधान्यक्रम गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी दर आठवड्यात 40 लाख लसींचा पुरवठा करावा. आत्तापर्यंत राज्याला 1 कोटी 6 लाख 23 हजार 500 डोसेस मिळाले आहेत. आजपर्यंत 92 ते 95 लाख डोस देण्यात आले आहेत. आता या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून काही केंद्रे बंद पडली आहेत. 15 एप्रिलनंतर 17.43 लाख डोसेस देण्यात येतील असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, त्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडेल. त्यामुळे आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे. 25 वर्षापुढील सर्वाना लसीकरण गरजेचे आहे या मागणीचा पुनरुचार देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.

ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा
राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. आताची कोविड बाधित रुग्णांची संख्या पहाता 1700-2500 मे.टन इतक्या ऑक्सीजनची एप्रिल अखेरपर्यंतची मागणी असेल. त्यामुळे पुरवठा सुरळित राहण्यासाठी महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा होणे ही अत्यंत निकडीची आणि अत्यावश्यक स्वरूपाची गरज आहे.

रेमडिसीवीर उपलब्धता
देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमडीसीव्हीरचा पुरवठा व्हावा. या औषधाच्या किंमतीवर ड्रग कंट्रोलरचे नियंत्रण असावे. महाराष्ट्रामध्ये आजघडीस रेमडिसीवीरच्या साधारणत 50 ते 60 हजार बाटल्यांचा वापर सुरु आहे. सक्रिय रुग्णांची संख्या लक्षात घेता ही एप्रिल अखेरपर्यंत ही गरज प्रति दिन 90 हजार ते 1 लाख बाटल्या याप्रमाणे वाढू शकते. अनेक ठिकाणी केवळ सिटी स्कॅन केलेल्या रुग्णाला रेमडिसीवीर दिले जाते. आयसीएमआरला ही रेमडिसीवीरचा हा अति व गैरवापर होऊ नये म्हणून त्याच्या वापराचा प्रोटोकॉल निश्चित करण्याची विनंती आहे. रेमडिसीवीरची निर्यातही थांबवावी.

व्हेंटीलेटर्स द्यावेत
केंद्राने जादा 1200 व्हेंटीलेटर्स द्यावेत तसेच जे पाठवले आहेत ते सध्या तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. त्या सुरु करण्यासाठी तंत्रज्ञ द्या, ऑपरेशनल करून द्यावे