Paithani Saree Gift To 5000 Doctors, Nurses, Asha Workers On The Occasion Of Bhaubeej


पालघर : भाऊबीज म्हणजे बहिण-भावाचे नाते अधिक घट्ट करण्याचा दिवस. याच शुभ मुहूर्तावर कोरोना संकटात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका, महिला डॉक्टर, परिचारिका यांना पैठणी साडी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात अतुलनीय काम करणारी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने जवळपास पाच हजार कोरोना योद्ध्यांना महिला वर्गाची सर्वाधिक पसंतीची पैठणी साडी भेट देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली.

खरंतर संपूर्ण जगाबरोबर आपल्या देशाला वेठीस धरलेल्या कोवड-19 या महाभयंकर आजाराशी स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता महिला डॉक्टर्ससहित आशा स्वयंसेविका, परिचारिका आणि महिला आरोग्य कर्मचारी लढा देत आहेत. त्यांनी दिलेल्या रुग्ण सेवेबद्दल त्याचप्रमाणे गावपाड्यात जाऊन ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’च्या माध्यमातून धोका पत्करुन कोरोनापासून सावधगिरीचा धडे देणाऱ्या आशा स्वयंसेविका यांचा भाऊबीजेला सन्मान करण्यात आला.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थपाक निलेश सांबरे आणि महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिका पानवे यांची ही कल्पना होती. त्यानुसार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्र आणि कोविड सेंटर्स इथे प्रतिनिधींची टीम पाठवून प्रत्येक आरोग्य भगिनींना पैठणी भेट देऊन अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली.

काही महिन्यांपासून राज्य, देशासह जगावर कोरोनाव्हायरसचं संकट आलं आहे. या संकट काळातही अनेक योद्ध्यांनी आपले कर्तव्य बजावत सेवा दिली. यामध्ये सामाजिक संस्था, पोलीस, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, शासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. कोरोनाचे संकट अजून शमलेलं नसून अजूनही सर्वच योद्धे दिवसरात्र आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे महिला डॉक्टरांसह आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता आणि भाऊबीजेची भेट म्हणून पैठणी देण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: