MP Subramanian Swamy Says Modi Should Delegate The Conduct Of Corona War To Gadkari Relying On PMO Is Useless


नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून रुग्णालयांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि बेड्सच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशावेळी कोरोनाची लढाई लढताना पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी या लढाईची कमान आता नितीन गडकरींकडे सोपवावी अशी सूचना खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. 

खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत अनेक वेळा मोदी सरकारला सूचना केल्या आहेत. आताही त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच प्रकारची एक सूचना केली आहे. ते म्हणतात की, “भारताने आतापर्यंत इस्लामिक राज्यकर्त्यांच्या आक्रमणापासून आणि साम्राज्यवादी ब्रिटिशांच्या कचाट्यातून आपली यशस्वी सुटका करुन घेतली आहे. त्याच पद्धतीने आताही कोरोनाच्या संकटावर मात केली जाईल. देशाला आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल आणि ती लाट लहान मुलांसाठी धोकादायक असणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपण त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशावेळी पंतप्रधान कार्यालयावर अबलंबून राहण्याला काही अर्थ नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता या लढाईची कमान नितीन गडकरींवर सोपवावी.”

 

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना कोरोना विरोधातील या लढाईत मोकळीक दिली नसल्याचं सांगितलं आहे. पण ते विनम्र असल्याने त्यांनी आतापर्यंत आपले कर्तव्य पार पाडले असून नितीन गडकरींच्या मदतीने ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतील असंही खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं आहे.

खासदार सुब्रमण्यम स्वामींच्या या ट्वीट्सवर कमेंटचा पाऊस पडला असून त्यामध्ये सुब्रमण्यम स्वामींची सूचना बरोबर असल्याचा सूर अनेकांनी आवळला आहे.

यापूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी कोविड परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं ट्वीटवरुन अभिनंदन केलं होतं.

महत्वाच्या बातम्या: Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *