Maharashtra Lockdown : राज्यात कुठे कुठे वीकेंड लॉकडाऊन? आज आणि उद्या ‘या’ शहरांमध्ये कडक निर्बंध 


Maharashtra Lockdown : राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. राजधानी मुंबईतही सहा महिन्यातील सर्वात मोठी वाढ झाली आहे.  शुक्रवारी राज्यात 15,817 रुग्णा वाढले आहेत तर 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत शुक्रवारी गेल्या 6 महिन्यातली मोठी रुग्णवाढ झाली. मुंबईत शहरात 1646 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णांची संख्या ही पंधराशेच्यावर आहे तर नागपुरातही रुग्णांची संख्या तब्बल 2000 हजारांच्या पार गेली आहे. पुणे शहर आणि ग्रामीण मिळून 2423 कोरोना रुग्णा वाढले आहेत तर नाशिक जिल्ह्यात आज 1135 नवे रुग्ण तर 8 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे नागपुर, नाशिकसह राज्यातील काही शहरांमध्ये वीकेंड लॉकडाऊन करण्यात आलाय.

नागपूर- नागपुरात आज वीकेंड लॉकडाऊन आहे. तर 15 मार्चपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. विकेंड लॉकडाऊनमध्ये पालिकेने लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र 15 मार्च पासून नागरिकांना लॉकडाऊनमुळे बाहेर पडण्यावर बंदी असणार आहे.  

औरंगाबाद-  उद्या औरंगाबाद जिल्हा संपूर्ण लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहतील. औरंगाबाद कोरोनाबधितांचा रोजची संख्या 1 हजार रुग्णांपर्यंत जावून पोहोचली आहे. 

नाशिक- जीवनावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील दारू दुकानांसह सर्व दुकाने शनिवार आणि रविवारी बंद राहणार आहेत. यासोबतच शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात येणार आहे. एकप्रकारे लॉकडाऊनसारखे चित्र बघायला मिळणार आहे.

पिंपरी-  कोरोनाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यासाठी नवे निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. मात्र पिंपरी चिंचवडने स्वतंत्रपणे नवी नियमावली जाहीर केली आहे. दुकानांमध्ये आणि भाजी मंडईत गर्दी न करण्याचे आदेश आहेत.   

परभणी– कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून परभणी जिल्ह्यात कालपासून दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.  

मनमाड-  शनीचे अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील शनी मंदिरात शनी अमावस्येला यात्रा भरत असते. मात्र नांदगाव तालुक्यात वाढते करोना रुग्ण संख्या लक्षात घेता आजची यात्रा रद्द करण्यात आली.

धुळे – एकीकडे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, रविवार पासून जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला असतांना नागरिकांमध्ये मात्र निष्काळजीपणा अजूनही दिसून येत आहे.

नंदुरबार आणि शहाद्यातील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार आणि शहाद्यातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय. दोन महिन्यांपूर्वी अनलॉकच्या माध्यमातून 5 ते 12 च्या शाळा सुरु करण्यात आल्या होत्या मात्र आता पुन्हा बंद करण्याची वेळ आली आहे. 13 मार्च ते 31 मार्चपर्यंत नंदुरबार आणि शहाद्यातील शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहे. गेल्या तीन दिवसांत या दोन्ही शहरांमध्ये तीनशे पेक्षा जास्त रुग्ण आढळलेत. जिल्ह्यातील इतर शहरांमधील शाळा मात्र सुरु राहणार आहेत.

 मीरा भाईंदरमध्ये लॉकडाऊनची घोषणा
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मीरा- भाईंदर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. मीरा – भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट असलेल्या भागात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. मीरा- भाईंदर क्षेत्रातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 13 ते 31 मार्च मध्यरात्री 12 पर्यंत  हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रात लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान मीरा भाईंदर हॉटस्पॉट क्षेत्राबाहेरील सर्व हॉटेल, बार, बँक्वेट हॉल आणि फूड कोर्ट 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सुरु राहणार आहे. तसेच सर्व दुकाने सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत 30 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.शुक्रवारी  मीरा- भाईंदर क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. आतापर्यंत मीरा भाईंदर क्षेत्रातील 27, 797 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.  त्यापैकी 26, 199 रुग्ण बरे झाले असून 792 रुग्णांवर उपचार सुरू आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून नये, असं आवाहनही करण्यात आले आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *