Maharashtra Coronavirus restrictions for night curfew imposed from March 27 | Maharashtra Coronavirus Updates


Maharashtra Coronavirus Updates शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात सातत्यानं वाढणारे कोरोना रुग्णांचे आकडे पाहता सरकारकडून Mission Begin Again काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य शासनानं लॉकडाऊनचा पर्याय तूर्तास दूरच ठेवला आहे ही बाब महत्त्वाची. 27 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध 15 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.  

नव्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीच्या जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असेल. रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी कायम असेल. यामध्ये नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे या नियमांचं पालन अनिवार्य असेल. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याऱ्यांस दंड ठोठावण्यात येणार आहे, शिवाय मद्य, पान, गुटखा, तंबाखू या पदार्थांचं सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यासही बंदी असेल. 

कार्यालयांसाठीचे निर्बंध

शक्य असेल त्या सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची मुभा देण्यात येण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. सर्व खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी असेही आदेश देण्यात आले आहेत. शिवाय नोकरीच्या ठिकाणी कामाच्या वेळापत्रकाचं पालनही केलं जाणं अपेक्षित आहे. सदर ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाणं अपेक्षित.

कंटेन्मेंट झोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्रांसाठीचे निर्बंध 

स्थानिक प्रशासनानं घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अर्थात कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व नियम हे पुढील आदेशांपर्यंत लागू असणार आहेत. सदर ठिकाणची परिस्थिती पाहत त्याचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासन अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींसाठी परवानगी द्यायची की नाही, नागरिकांना वावरण्यास मुभा द्यायची की नाही याचे निर्णय़ घेऊ शकते. प्रतिबंधित क्षेत्रात सापडलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा 72 तासांमध्ये शोध घेऊन त्यांना 14 दिवसांच्या विलगीकरणात ठेवावं. 

काही अतीमहत्त्वाच्या गोष्टी…. 

 – 27 मार्च 2021च्या मध्यरात्रीपासून हे नियम लागू असतील. ज्याअंतर्गत रात्रीच्या जमावबंदीमुळं रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत पाचहून अधिकजणांना एकाच ठिकाणी जमण्यास बंदी असेल. नियमांचं उल्लंघन झाल्यास प्रत्येक व्यक्तीकडून 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. 

– उद्यानं, समुद्रकिनाऱ्यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणं रात्रीच्या जमावबंदीमुळं रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत बंद असतील किंवा या ठिकाणांवर प्रवेश निषिद्ध असेल. 

– मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीकडून 500 रुपये आणि रस्त्यात थुंकणाऱ्या व्यक्तीकडून 1000 रुपयांचा दंड आकारला जाईल. 

– सर्व मॉल्स, सिनेमागृह, सभागृह, कार्यक्रम स्थळं, रेस्तराँ रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत बंद असतील. होम डिलीव्हरीसाठी मात्र निर्बंध नाही. 

– कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये. कोणत्याही कार्यक्रमस्थळी असं आयोजन केल्याचं आढळून आल्यास सदर ठिकाणाला प्रदीर्घ काळासाठी टाळे ठोकण्यात येईल. 

– लग्नसोहळ्यासाठी 50हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती कायदेशीर कारवाईस पात्र असेल. याशिवाय विवाहस्थळही पुढील आदेशांपर्यंत बंद करण्यात येईल. 

– अंत्यविधींसाठी 20 लोकांचची उपस्थिती असणं अपेक्षित. स्थानिक यंत्रणांची याबाबतची काळजी घ्यावी. Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *