Interacting With Covid Patients In The ICU Via Video Calling; Health Dept Innovative


मुंबई : कोरोना संसर्गजन्य रोग असल्याने बाधित झालेल्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी अतिदक्षता विभागातील विशेष कक्षात भरती करण्यात येते. याठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश नसतो. त्यामुळे त्यांचा रुग्णाशी संपर्क तुटतो. त्या रुग्णाबाबत डॉक्टरांकडून माहिती मिळायला वेळ लागत असल्याने व माहिती मिळाली तरी समाधान न झाल्याने मनात हुरहुर राहत होती. खरेच आपल्या रुग्णाची तब्येत व्यवस्थित आहे का, योग्य औषधोपचार मिळतो काय, जेवणाची सोय वेळेवर होते का, यासारख्या नानाविध शंका आप्तस्वकीयांची मानसिक शांती भंग करीत होत्या. त्यात कोणी उपचाराला प्रतिसाद दिला नाही किंवा काही अनुचित घडले तर डॉक्टरांनी पर्यायाने शासनाने रुग्णांकडे लक्ष दिले नाही अशीदेखील ओरड होत होती. विशेषत: उपचारात दिरंगाई, उपचार योग्य नसणे, काळजी घेतली जात नाही असे आरोप नातेवाईकांकडून सातत्याने होत असत. नातेवाईक वॉर्डाबाहेर असल्याने त्यांना वॉर्डातील वस्तुस्थितीही माहिती होत नसे.

कोविड रूग्णांसंदर्भात वरील अडचण दूर करण्यासाठी चंद्रपूर येथील प्रशासकीय यंत्रणेने व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या सुविधेमुळे नातेवाईकांना प्रत्यक्ष रुग्णांशी दृष्यप्रणालीद्वारे संवाद साधता येतो. रुग्णांची स्थिती प्रत्यक्ष बघता येते सोबतच उपचाराविषयी व प्रशासनाने करून दिलेल्या उपचाराच्या सुविधेबद्दल प्रत्यक्षात रुग्णाकडूनच माहिती घेता आल्याने मनातील हुरहुर कमी होऊन नातेवाईक व रुग्ण दोघांना आंतरिक समाधान मिळू लागले आहे. तसेच प्रत्येक बाबीवर वेळोवेळी स्पष्टीकरण देण्याचा रुग्णालय प्रशासनाचा भारदेखील कमी झाला असून उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरील मानसिक दडपणसुद्धा कमी झाले आहे. यामुळे एकंदरीत प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास नक्कीच मदत झाली आहे.

कोरोना व्हायरस लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी, Pfizer कंपनीचा दावा

कोरोना रुग्णांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधण्याची ही सुविधा कोविड रुग्णालयासमोरील समुपदेशन केंद्रात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दररोज संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी 10 ते 15 मिनिटे अगोदर रुग्णालयाच्या मदत केंद्रावर नोंदणी करणे आवश्यक राहील. यावेळी संबंधितांना रुग्णाचे नातेवाईक असल्याचे पटवून द्यावे लागेल. यासाठी आधारकार्ड किंवा इतर कोणताही नातेसंबंधाची खात्री होईल, असा पुरावा आवश्यक आहे. या केंद्रावर नियुक्त सामाजिक वैद्यकीय अधीक्षक हे रुग्णांच्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल लावून रुग्णांशी बोलण्याची व त्यांना मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. व्हिडिओ कॉल करणाऱ्या नातेवाईकांच्या नोंदी 1 नोव्हेंबरपासून घेण्यात आल्या असून त्यानुसार आजपर्यंत 110 वेळा या सुविधेचा लाभ घेण्यात आला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. याची तात्काळ दखल घेऊन अधिष्ठाता डॉ. हुमणे यांनी व्हिडिओ कॉलिंगची सुविधा दुसऱ्या दिवसापासूनच सुरू केली आहे. रुग्णासोबत संवादासाठी रुग्णालय प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्हिडिओ कॉलिंग सुविधेबाबत नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: