धुळे : कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्याने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील राजेंद्र भानुदास पाटील या शिक्षकाने तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदर शिक्षकाला कोरोना सदृष लक्षणं दिसून आली असल्याने त्याने कोरोना चाचणी करून घेतली होती. त्यामुळे कोरोना झाल्याच्या भीतीतून त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती शिक्षकाच्या नातेवाईकांनी दिली आहे.

शिरपूर येथील रहिवासी असणारे राजेंद्र भानुदास पाटील यांना कोरोना सदृष लक्षणे दिसून आली होती. राजेंद्र पाटील यांनी पुढील तपासणीसाठी नमुने दिले होते. सदरची तपासणी केली असता त्यांना न्यूमोनिया झाला असल्याचं समोर आलं होतं. दिलेल्या नमुन्यांचा अहवाल येणे बाकी असताना आपल्याला कोरोना झाला आहे या भीतीतून राजेंद्र पाटील यांनी तापी नदीवरील सावळदे फाटा येथून उडी मारून नदीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

कोरोना झाल्याच्या भीतीतून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती राजेंद्र पाटील यांच्या नातेवाइकांनी दिली आहे. दरम्यान घटनास्थळी राजेंद्र पाटील यांची दुचाकी गाडी तसेच डॉक्टरांची फाईल मिळून आली आहे. या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, राजेंद्र पाटील यांच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू होतं. अखेर त्यांचा मृतदेह मिळाला असून त्याचे शवविच्छेदन शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे. राजेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

महत्वाच्या बातम्या :

जुन्या वादातून नातवाने आजोबांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून केलं ठार

बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड; सापळा रचत पोलिसांकडून पर्दाफाश

धुळ्यात मद्यधुंद अवस्थेत महिलेचा धिंगाणा, महिलेची पोलिसांना धक्काबुक्की