Covid-19 Vaccination Dry Run Health Minister Dr Harsh Vardhan Says Corona Virus Vaccine Will Be Provide Free Of Cost Across India


नवी दिल्ली : देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु झालं आहे. यातच एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांनी त्यांना दिल्लीप्रमाणं देशातील सर्व राज्यात कोरोना लस मोफत देणार का? असा सवाल केला असता डॉ हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना लस दिल्लीतच नाही तर सर्व देशात मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी कुठलंही शुल्क घेतलं जाणार नाही.

Dry Run : कोरोना लसीच्या ड्राय रनला सुरुवात, राज्यात ‘या’ ठिकाणी सुरुय लसीकरणाची रंगीत तालिम

आज देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु आहे. याआधी देशातील चार राज्यांतील दोन दोन जिल्ह्यात लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ड्राय रन घेतला होता. राज्यातील नागपूर, जालना, पुणे, नंदुरबारमध्ये हे ड्राय रन सुरु झालं आहे. या चारही जिल्ह्यात फ्रंटलाईन वर्कर्संना पहिल्यांदा कोरोनाची लस दिली गेली आहे. कोविडच्या लसीकरणाची जालन्यामध्ये रंगीत तालीम घेतली जात आहे. जालन्यात स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे हे यावेळी उपस्थित आहेत. त्यांनी खास एबीपी माझावर या ड्रायरनचा डेमो दाखवला. आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रनची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. दरम्यान जालन्यात रंगीत तालिमेची तयारी देखील पूर्ण झालीय. इमारत पूर्ण सजवलेली आहे.

नागपुरात आरोग्य सेविकांपासून ड्राय रनला सुरुवात

नागपुरात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन घेतला जात आहे. मनपाच्या के टी नगर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी ही रंगीत तालीम घेतली जात आहे. आज सकाळी प्रीतमा साखरे आणि कल्याणी कोटांगले या आरोग्य सेविकांपासून या ड्राय रनला सुरुवात झाली. हात सॅनिटाईज करणे, तापमान मोजणे, यादीत नाव तपासणे, आयडी तपासणे, कोवीनअँप वर नाव तपासून प्रत्यक्ष लसीकरण नंतर अर्धा तास निरीक्षण अशी ही प्रक्रिया आहे. ज्या आरोग्य सेविकांची नोंदणी करत त्यांना लसीकरणासाठी निवडण्यात आले आहे, त्यांनी सरकारला धन्यवाद दिले, आम्ही कोरोना संकटाच्या काळात फ्रंटलाईनमध्ये काम केले, संकटाला सामोरे गेले आणि जेव्हा लस आली शासनाने आमची आठवण ठेवली याचे समाधान वाटत असल्याचे मत लाभार्थी आरोग्य सेविकांची व्यक्त केले.

 पुण्यातील तीन केंद्रांवर प्रक्रिया 

महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यात समावेश असून पुण्यातील तीन केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. औंध जिल्हा रुग्णालय, मान प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयाची यासाठी निवड करण्यात आली आहे. पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात देखील कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम पार पडली. कोविड पोर्टलवर नोंद केलेल्या व्यक्तीला टेक्स्ट मेसेज द्वारे लसीकरणासाठी कधी आणि किती वाजता यायचं हे कळवले जाणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात ही काळजी घेतली जाणार

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण जेव्हा खऱ्या अर्थाने सुरू होईल तेव्हा इंटरनेट सेवा, आणि वीज सुरू राहील यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. जनरेटरने वीज उपलब्ध केली जाईल शिवाय मोबाइल नेटवर्क खंडीत होणार नाही, यासाठी मोबाईल कंपनीशी सम्पर्क साधला जाईल. पहिल्या टप्प्यात 13 हजार आरोग्य कर्मचाऱ्यां लस दिली जाणार आहे, दुसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाईल. तो टप्पा अत्यंत आव्हानात्मक असून त्यासाठी प्राशकीय यंत्रणा तयार असल्याचा विश्वास नंदुरबारचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुडे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. शहरी भागात आरोग्य सेवा व्यवस्थित पुरविल्या जातात, मात्र ग्रामीण भागात लसीकरण करताना काय अडचणी येतात याची पहाणी करण्यासाठी नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात ड्राय रन घेण्यात आला. नंदुरबारच्या पहिल्या लाभार्थी रेश्मा चाफेटकर ह्या ठरल्या. कोरोना लसी संदर्भात दडपण होते, भीती होती, पण ती आता गेली आहे. जिल्ह्यातून पहिला क्रमांक लागल्याचा आनंद आहे. मात्र दडपण होते. पण देशासाठी पुढे आले. लवकरात लवकर ही लस सर्वसामान्यांना मिळावी अशी अपेक्षा नंदुरबारच्या पहिल्या लाभार्थी रेश्मा चाफेटकर यांनी व्यक्त केलीय.

ड्राय रन महत्वाचा का आहे?

लसीकरण कार्यक्रम राबवतांना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येत आहे. तसेच लसीकरण मोहिमेदरम्यान केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीसाठी फिडबॅक मिळवून त्यात योग्य ते बदल करण्यासाठी हा रन असणार आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येतील प्रत्येक माणसापर्यंत लस पोहोचवायची असेल तर मायक्रो प्लानिंग महत्वाचे आहे, त्यासाठी हा ड्राय रन महत्वाचा आहे.

सीरमच्या ‘कोविशील्ड’ लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी

सर्व राज्यात कोरोना लसीची ड्राय रन होणार

ड्राय रन सर्व राज्यांतील राजधानीमध्ये तीन सत्रामध्ये घेण्याचा प्रस्ताव आहे. काही राज्यांत अशा जिल्ह्यांचा समावेश आहे जे दुर्गम भागात आहेत. ड्राय रन ही प्रत्यक्षात लसीकरण करताना ज्याप्रमाणे नियोजन असते. तशाच प्रकारे होणार आहे. मात्र, या ड्राय रनमध्ये लस दिली जाणार नाही, फक्त लोकांचा डेटा घेतला जाईल, त्याला Co Win अ‍ॅपवर अपलोड केला जाईल. मायक्रो प्लॅनिंग, सेशन साइट मॅनेजमेन्ट आणि ऑनलाइन डेटा सुरक्षित करणे यासारख्या बर्‍याच गोष्टींची चाचणी केली जाईल. याव्यतिरिक्त, लसीकरण AEFI म्हणजेच लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांनंतर होणाऱ्या कोणत्याही संभाव्य प्रतिकूल घटनांच्या व्यवस्थापनावर ड्राय रनचा महत्त्वपूर्ण फोकस असेल.

चार राज्यात ड्राय रन यशस्वी

याआधी आसाम, आंध्र प्रदेश, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाची ड्राय रन यशस्वीरित्या झाली आहे. 28 आणि 29 डिसेंबरला या चार राज्यात ड्राय रन घेण्यात आला होता. देशात कोरोना विषाणूची दहशत कायम आहे. आता कोरोना विषाणूच्या नव्या विषाणूनेही भारतात शिरकाव केला आहे. आतापर्यंत 25 हून अधिक लोकांना या नवीन विषाणूची लागण झाली आहे. ज्यांचे नमुने नवीन स्ट्रेन साठी पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांना राज्य सरकारच्या निर्देशानुसार स्वतंत्र खोल्यांमध्ये वेगळे केले गेले आहेत.

सीरमच्या ‘कोविशील्ड’ लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वॅक्सिन एक्सपर्ट पॅनेलने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) मान्यता देण्याची शिफारस केली आहे. ब्रिटन आणि अर्जेंटिनानंतर ऑक्सफोर्ड लसीला मान्यता देणारा भारत तिसरा देश आहे. अॅस्ट्रोजेनिकाच्या संयुक्त विद्यमाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ‘कोविशिल्ट’ लस तयार करत आहे. ऑक्सफोर्डच्या वतीने ही लस तयार केली जात आहे. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने भारत बायोटेकने ‘कोवॅक्सिन’ तयार केली आहे, ज्याचे सादरीकरण बुधवारी पॅनेलसमोर करण्यात आले. फाईजरने आपला डेटा सादर करण्यासाठी अधिक वेळ द्यावा अशी मागणी केली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि फायजरने देखील आतपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. सर्वात आधी 9 डिसेंबर रोजी कोरोना लसीसंदर्भात सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली होती.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *