Coronavirus Update: Avoid Going Playground Within Few Days Of Getting Recovered From Corona


पुणे : कोरोनाची लागण झाल्यानंतर तुम्ही काही दिवसांतच खेळाच्या मैदानात उतरत असाल तर हे नसतं धाडस तुम्ही करू नका. कारण सांगलीनंतर पुण्यातही कोरोनामुक्त झालेल्या खेळाडूला मैदानातच हृदयविकाराचा धक्का बसल्याचे आणि त्यानंतर मृत्यू झाल्याचे समोर आलंय. आजची घटना ही पुण्याच्या जुन्नरमध्ये घडली. क्रिकेट खेळताना महेश उर्फ बाबू नलावडे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. नॉन स्ट्राईकला उभे असताना अचानक ते खाली बसले आणि नंतर ते जमिनीवर कोसळले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता हृदयविकाराचा धक्का आल्याचं निष्पन्न झालं. साडेतीन महिन्यांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती, अशी माहिती त्यांच्या भावाने दिली.

जाधववाडी येथे मयूर चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला, याचा व्हिडीओ देखील समोर आलाय. आज दुपारी एकच्या सुमारास ओझर आणि जांबुत संघात सामना सुरू होता. ओझर संघाची फलंदाजी सुरू असताना बाबू सोबत ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे टेनिस क्रिकेट प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जातीये. महेश उर्फ बाबू नलावडे हे 45 वर्षांचे होते. त्यांचा जन्म हा मुंबईचा, पण सुट्ट्यानिमित्त जुन्नर तालुक्यातील धोलवड या मूळगावी नेहमीच येणं व्हायचं. लहानपणापासूनच क्रिकेट हा त्यांचा पसंतीचा खेळ होता. मुंबई असो की धोलवड इथं त्यांनी क्रिकेटची अनेक मैदान गाजवली. पण नंतरच्या काळात नोकरी लागली अन् क्रिकेट खेळायला वेळ मिळत नव्हता. सध्या ते टाईम्स ऑफ इंडिया या पेपरमध्ये प्रिंटिंग डिपार्टमेंटला असिस्टंट मॅनेजर पदावर होते.

लॉकडाऊन पडल्यापासून ते घरून काम करत होते. याच दरम्यान साडेतीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. या कोरोनाशी त्यांनी यशस्वी सामना केला. मग मुंबईतल्या दूषित वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आणि वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने ते गावी आले. अडीच महिन्यांपासून नारायणगाव येथील घरातून त्यांचं काम सुरू होतं. अशातच जाधववाडी गावात क्रिकेटचे सामने रंगल्याची कल्पना त्यांच्या जुन्या संघातील खेळाडू मित्रांनी दिली. आता इथं मोकळाच आहे आणि कोरोनातून ही पूर्ण बरा झालोय असा समज झाल्याने त्यांनी क्रिकेटचे मैदान पुन्हा गाजविण्यासाठी बॅट हातात घेतली. बारा वाजताच्या रणरणत्या उन्हात ते मैदानात पोहचले आणि साधारण एकच्या सुमारास ते फलंदाजीला मैदानात उतरले. नॉन स्ट्राईकला उभे असताना ते अचानक खाली बसले आणि काही सेकंदातच जमिनीवर कोसळले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

सांगलीत ही कोरोनामुक्त झालेल्या एका खेळाडूने तीन महिन्यातच मैदान गाठलं. भर उन्हात क्रिकेट खेळताना त्यांना ही हृदयविकाराचा धक्का बसला आणि मृत्यू झाला. अगदी तशीच घटना पुण्याच्या जुन्नरमध्ये ही घडली. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या प्रत्येकाने यातून धडा घ्यावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रत्येक पाउल उचलावं.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *