Coronavirus Cases India India records over 1.07 lakh daily new COVID-19 cases for first time | Coronavirus Cases India


नवी दिल्ली : देशभरात मंगळवारी (6 एप्रिल) तब्बल 1.07 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात नोंदवलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. याच दरम्यान पुढील चार आठवडे ‘अतिशय महत्त्वाचे‘ असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला असून या महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करायला हवं, असंही म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलं की, नागरिकांनी मास्क लावण्यासारख्या खबरदारीच्या उपायाला जणू काही ‘तिलांजली’ दिली आहे. 

देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशभरात 1.07 लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. भारतात जानेवारी 2020 मध्ये महामारीला सुरुवात झाल्यापासून एकाच दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे.

तीन दिवसात दुसऱ्यांदा एक लाखापेक्षा जास्त रुग्णांची नोंद 
देशात मागील तीन दिवसात दुसऱ्यांदा एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. भारतात रविवारी (4 एप्रिल) 24 तासात 1 लाख 03 हजार 558 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 

केंद्र सरकारने म्हटलं की, देशात कोरोनाव्हायरस मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वेगाने पसरत आहे आणि नागरिकांनी महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी सहकार्य करायला हवं. केंद्र सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषदेत म्हटलं की देशात एकाच दिवशी एक लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद पुन्हा एकदा होऊ शकते आणि ही मागच्या तुलनेत अधिक असू शकते.

देशात रविवारी 1 लाख 03 लाख 558 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल (6 एप्रिल) सकाळी आठ वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात 96 हजार 982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 

कोरोना संसर्ग वाढल्याने महाराष्ट्रासह, दिल्लीमध्येही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे जो 30 एप्रिलपर्यंत कायम राहिल. कोविड-19 रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लसीकरणासाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी केली जात आहे. मात्र सर्वाधिक धोका असलेल्या नागरिकांना सुरक्षित करणं हा उद्देश असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *