CoronaVirus | कोरोनाचा संसर्ग लावतोय चित्रिकरणांना ब्रेक


मुंबई : एकिकडे कोव्हिडला पळवून लावण्यासाठी लसीकरणाच्या मोहिमेनं वेग घेतला असतानाच, कोव्हिडचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या वाढताना दिसू लागली आहे. गेल्या वर्षी आलेल्या कोव्हिडच्या लाटेची दखल घेऊन लॉकडाऊन लावण्यात आला. सर्व थिएटर्स, चित्रिकरणं बंद झाली. त्यामुळे कलाकार घरात होते. त्यानंतर घरबसल्या या कलाकारमंडळींनी बनवलेल्या रेसीपी, केलेले डान्स.. आदी अनेक गोष्टींनी सामान्य लोकांचं मनोरंजन केलं.  राज्य सरकारने चित्रिकरणाला परवानगी दिल्यानंतर छोट्या पडद्यावरचे काही कलाकार कोव्हिड पॉझिटिव्ह निघाले. पण चित्रपटांत काम करणाऱ्या कलाकारांची संख्या यात कमी होती. पण आता या दुसऱ्या लाटेत मात्र कोव्हिडच्या संसर्गात कलाकार सापडू लागले आहेत. याचा थेट परिणाम चित्रिकरणावर होऊ लागला आहे. 

 गेल्या काही आठवड्यांपासून कोव्हिड पॉझिटिव्ह आलेल्या कलाकारांच्या यादीत भर पडू लागली आहे. काही काळापूर्वी अभिनेता रणबीर कपूरला कोरोना झाला. त्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. रणबीर सध्या ब्रह्मास्त्रच्या शेवटच्या टप्प्यावर काम करतो आहे. अशात त्याला कोरोना झाल्यामुळे त्या चित्रपटाचं उरलेलं काम थोडं मंदावलं आहे. शिवाय रणबीरला घेऊन काही जाहिरातींची चित्रिकरणंही करण्यात येणार होती. त्या सगळ्यालाच आता ब्रेक लागला आहे.

रणबीरला कोरोना झाल्यामुळे त्याची मैत्रीण आलिया भट्टने स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं. त्यातच भन्साळींना कोरोना झाल्यानंतर तर तिने चाचणी करून घ्यायचा निर्णय घेतला. आलिया आणि भन्साळी हे दोघेही गंगूबाई काठियावाडी या सिनेमात एकत्र काम करत होते. भन्साळींना कोरोना झाल्यामुळे गंगूबाईचं पुढचं काम थांबलं आहे. अलिया भट्टने सुरक्षिततेची खबरदारी म्हणून आपली टेस्ट करून घेतली. ती निगेटिव्ह आल्यानंतर ती पुन्हा एकदा घराबाहेर पडली. रणबीर मात्र अजून क्वारंटाईन्ड आहे. अलियाने रणबीरसोबतचा हात हातात घेतलेला एक फोटो इन्स्टावर टाकत मेजर मिसिंग अशी पोस्टही टाकलेली बरीच व्हायरल झाली. कोरोनाचा हा विळखा सुटावा म्हणून महाशिवरात्री दिवशी ती आणि अयान मुखर्जी यांनी शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतलं. 

दुसरीकडे सायना चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना दिग्दर्शक त्या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनाही कोरोनाची लागण झाली. अमोल गुप्ते यांचा हा एक महत्वाकांक्षी चित्रपट आहे. परिणिती चोप्रा या चित्रपटात सायना नेहवालची भूमिका करते आहे. या चित्रपटाचं प्रमोशन जोरात सुरू असतानाच अमोल गुप्ते यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं. आता त्यांची तब्येत पूर्ण बरी झाली आहे. 

सध्या मनोज वाजपेयी, आशिष विद्यार्थी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  आपआपल्या सोशल मीडियावरूनच त्यांनी ही माहिती दिली.  त्यातल्या त्यात जमेची बाजू अशी यापैकी कुणाचीही स्थिती गंभीर झालेली नाही. पण अशाने संबंधित चित्रिकरणांना ब्रेक लागू लागला आहे. मनोज वायपेयी डिस्पॅच या चित्रपटाचं चित्रिकरण करत होते. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कोरोना झाल्यानंतर त्याची लागण वाजपेयी यांना झाल्याचं कळतं. अर्थातच या चित्रपटाचं चित्रिकरणं पुढच्या दीड महिन्यासाठी बंद करण्यात आलं आहे. आशिष विद्यार्थी दिल्लीत चित्रिकरण करताना त्यांना बारीक ताप आला. त्यांनी चाचणी केली आणि त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. दिल्लीत येण्यापूर्वी विद्यार्थी यांनी मुंबई, वाराणसी या भागात शूट केलं आहे. त्यामुळे हा संसर्ग नेमका कुठून झाला हे आपल्याला कळत नसल्याचं त्यांनी सोशल मीडियावरून सांगितलं आहे.

आताशा भारताच्या विविध भागात सिनेमांच्या चित्रिकरणांनी वेग घेतला आहे. अशात ही कलाकार मंडळी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने हा संसर्ग नेमका झाला कुठून हे शोधणं निव्वळ अशक्य आहे. अशात आता पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीला कोव्हिडला प्रतिबंध करण्यासाठी घालून दिलेल्या नियम अटींची काटेकोर अंमलबजावणी करणं क्रमप्राप्त ठरलं आहे. 

संबंधित बातम्या :

Ranbir Kapoor च्या आठवणीत प्रेयसी आलिया भट्टची भावनिक पोस्ट

नवीन वर्षात रणबीर कपूरच्या ‘या’ चित्रपटाची घोषणा, ‘कबीर सिंह’ फेम संदीप रेड्डींचं दिग्दर्शन

 

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *