career in packaging: पॅकेजिंगचं तंत्र शिकायचंय? – career opportunities in packaging industry


आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

आजच्या बाजार व्यवस्थेत पॅकेजिंग हा एक स्वतंत्र व्यवसाय, अभ्यासविषय बनला आहे. माणसांपासून ते वस्तूंपर्यंत प्रत्येक बाबतीत बाह्य सादरीकरण महत्त्वाचं ठरत आहे. वस्तूचा दर्जा कसा आहे याच्या बरोबरीनेच त्याचं बाह्य आवरण कसं आहे? हा प्रश्नही महत्त्वाचा बनला आहे.

वस्तूच्या बरोबरीनेच धान्यं, फळं, फुलं, भाजीपाला, तयार अन्नपदार्थ, कृषी उत्पादन अशा सगळ्याच उत्पादनांना चांगल्या आकर्षक पॅकेजिंगची आवश्यकता भासत आहे. पॅकेजिंगसाठी नवनवीन डिझाइन्स करणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करणं अशा स्वरूपाचं काम या व्यावसायिकांना करावं लागतं. पॅकेजिंगमध्ये विज्ञान, अभियांत्रिकी विषयाबरोबरीने छपाई, मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग यांचाही समावेश होतो. योग्य मटेरियल निवडण्यापासून ते टिकाऊ होईल या दृष्टीने विविध गोष्टी यात कराव्या लागतात.

पॅकेजिंगकरिता विविध वस्तूंचा वापर केला जातो. लाकूड, पेपर, टिन, प्लेट, काच आदींपासून विविध प्रकारचे बोर्ड्स, प्लास्टिक, फ्लेक्झिबल पॅकेजिंग, थर्माकोल, बायोडिग्रेडेबल मटेरियल, लॅमिनेट व पॉलिव्हिनाइल क्लोराइड या गोष्टींचा वापर पॅकेजिंग मटेरियल म्हणून केला जातो. पॅकेजिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हा व्यवसाय स्वतंत्र मोठा उद्योगच बनला आहे. पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूनुसार त्या उद्योगाचं वर्गीकरण केलं जातं.

भौतिकशास्त्र वा रसायनशास्त्रातील पदवीधर या क्षेत्रासाठी उपयुक्त ठरतात. चिकित्सक वृत्ती, नवनवे आकार वा डिझाइन निर्माण करण्याच्या क्षमता असणाऱ्यांना या क्षेत्रात संधी आहेत. पॅकेजिंग मटेरियल तयार करणाऱ्या वा कोणत्याही कंपनीच्या पॅकेजिंग विभागात पॅकेजिंग टेक्नॉलॉजिस्ट उत्पादन, मार्केटिंग, संशोधन या विभागात काम करू शकता.

अभ्यासाला सुरुवात करा जोमाने!

संस्था आणि अभ्यासक्रम

पॅकेजिंगचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कमी आहेत. पॅकेजिंगमधील भारतातील अग्रगण्य संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, मुंबई ही आहे. भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेचं मुख्यालय मुंबई येथे असून चेन्नई, दिल्ली, कोलकाता, हैद्राबाद येथे शाखा आहेत. या संस्थेत पुढील अभ्यासक्रम चालतात…

० पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंग

हा दोन वर्षांचा पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. यासाठी भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, कृषी, फूड सायन्स, इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी या विषयांतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले पदवीधर पात्र असतात. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षा घेतली जाते. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व इंजिनीअरिंग या विषयांवर परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षा व मुलाखत असे त्याचे दोन टप्पे असतात. परीक्षा मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि हैद्राबाद येथे घेतली जाते. मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे. गुणवत्ताधारक व गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपदेखील मिळते.

एमबीबीबीएस अभ्यासक्रमात आता महामारी व्यवस्थापन

० सर्टिफिकेट अभ्यासक्रम (तीन महिने कालावधी)

या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर वा पदविकाधारक उमेदवार पात्र असतात. पॅकेजिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा उपयुक्त अभ्यासक्रम आहे. साधारणत: स्वत:चा उद्योग असणाऱ्या कुटुंबातील पदवीधर आणि परदेशातील पदवीधर यांचा या अभ्यासक्रमाकडे ओढा दिसतो.

० ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंग

हा १८ महिन्यांचा दूरशिक्षण अभ्यासक्रम असून याला एशियन पॅकेजिंग फेडेरेशनद्वारा प्रामाणित केलं गेलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरही हा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहे.

केमिकल की इलेक्ट्रीकल? इंजिनीअरिंगविषयी जाणू काही…

संपर्क

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग, अंधेरी (पूर्व), मुंबई

वेबसाइट- www.iip-in.com

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *