CA toppers: गॅस सिलिंडर वाटून मुलीला केले ‘सीए’; नाशिकच्या जगवाणी कुटुंबाची यशोगाथा – success story nashik lpg cylinder distributors daughter became ca


हायलाइट्स:

  • घरोघरी गॅस सिलिंडर वाटप करणाऱ्याच्या मुलीचे सीए होण्याचे स्वप्न साकार
  • आई-वडिलांच्या कष्टाचे झाले चीज
  • नाशिकच्या जगवाणी कुटुंबाची यशोगाथा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गॅस सिलिंडरचे घरोघरी वाटप करून एका पित्याने मुलीला चार्टर्ड अकौन्टंट (सीए) केले. तसेच मुीनेही आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करीत स्वप्न साकार केले. यामुळे उपनगरमधील सिंधी कॉलनीत आनंदोत्सव साजरा होत असून, प्रभाग १६ च्या नगरसेविका सुषमा पगारे यांच्या हस्ते पूजाचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

फाळणीनंतर नाशिकला अनेक सिंधी कुटुंबे राहण्यास आली. जगवाणी कुटुंब सिंधी कॉलनीत ८० वर्षांपासून राहत असून, दिलीप देवनदास जगवाणी हे गांधीनगर येथील एका गॅस एजन्सीत घरगुती गॅस सिलिंडर वाटपाचे काम करतात. अगोदर सायकलवर ते सिलिंडर वाटप करायचे. घरातील परिस्थिती हलाखीची, पत्नी माधुरी उपनगरमध्ये मिळेल ते काम करून कुटुंबाच्या घरखर्चास हातभार लावायची. मुलगा राज आणि मुलगी पूजा हे अभ्यासात हुशार. आई-वडिलांचे कष्टच त्यांची उच्च शिक्षणाची प्रेरणा झाली. आणि पूजा सीए झाल्याने जीवनात केलेल्या कष्टाचे फळ या दाम्पत्याला मिळाले.

बाह्यशिक्षणाव्दारे यश

पूजाने प्राथमिक शिक्षण होलिफ्लॉवर स्कूलमधून पूर्ण केले. पुढील शिक्षण नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयातून घेत उच्च शिक्षणासाठी फी परवडत नसल्याने पूजाने बाह्य प्रणालीने शिक्षण पूर्ण करून वाणिज्य पदवी मिळवली. सीपीटी परीक्षेत २०० पैकी १८५ गुण, त्यानंतर इंटर परीक्षेत संपूर्ण भारतात १६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यानंतर ‘सीए’च्या फायनल परिक्षेतही विशेष प्रावीण्य मिळवून अखेर ‘सीए’ झाली. याचे सर्व श्रेय पूजा माता, पिता आणि भावाला देते. परिस्थितीला दोष न देता ध्येय निश्चिती केल्यास मार्ग निघून यश पदरी पडते, असे दिलीप जगवाणी अभिमानाने सांगतात. या सत्कारावेळी रवी पगारे, महेश बनसिंगानी, त्रिलोक कटारिया, माया रिजवाणी, नानिक केसवाणी, भाविका कुकरेजा, हेमा जगवाणी, लकी वाधवाणी, करिष्मा कुकरेजा आदी उपस्थित होते.

हेही वाचा:CA Result 2021: डोंबिवलीचा वैभव हरिहरन देशात दुसरा
घोकंपट्टी नव्हे व्यवहार्य ज्ञान; CBSE बोर्डाचा नवा मूल्यांकन आराखडा
CA फायनल, फाउंडेशन जानेवारी परीक्षेचा निकाल जाहीर

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *