२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी सुरूम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि त्यांचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, शिक्षकांना कोविड चाचणी करावी लागणार होती. ही चाचणी सरकारमार्फत होणार असल्याचे सरकारने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

राज्यात २४ जूनपासून आतापर्यंत पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण ऑनलाइन सुरू होते. परंतु, राज्यात काही दिवसांत करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शालेय शिक्षण विभागाकडून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत राज्यातील सर्व शाळा येत्या काळात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, राज्यातील शाळा सुरळीतपणे सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मागील चार दिवसांपूर्वी शासन निर्णय जारी केला असून, नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि शाळा सुरू केल्या जाणार आहेत.

या आदेशानुसार, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १७ ते २२ नोव्हेंबर या दरम्यान कोविड-१९ साठीची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र ही चाचणी करण्यासाठी येणारा खर्च विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना परवडणारा नाही, अशी तक्रार विविध शिक्षक संघटनांनी केली होती. याचबरोबर शाळांमध्ये थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटर आदी उपकरणे आवश्यक होते. यासाठी मुख्याध्यापकांकडे निधी नसल्याची बाब मुख्याध्यापक संघटनेने समोर आणली होत. या सर्वाचा विचार करून शिक्षण विभागाने शाळांना थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटर आदी वैद्यकीय उपकरणे पुरविणे तसेच शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी मोफत करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असून यामुळे विनाअनुदानित शाळांतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केले.

शाळांचे निर्जंतुकीकरण करावे
शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यासाठी मुख्याध्यापकांकडे आवश्यक निधी उपलब्ध नाही. मुंबईमध्ये मनपाच्या एक हजार १२२ शाळा, खासगी अनुदानित शाळा, वेगवेगळ्या बोर्डांच्या शाळा याशिवाय रात्रशाळा अशा मिळून एक हजार ५०० पेक्षा जास्त शाळा व ज्युनिअर कॉलेजे आहेत. एकूणच दोन हजार ६०० पेक्षा अधिक शाळा व ६० हजारपेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. एवढ्या जास्त संख्येत असलेल्या शाळांची साफसफाई व निर्जंतुकीकरण करण्यास निश्चितच काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे १७ ते २२ नोव्हेंबर हा कालावधी शाळांची स्वच्छता, शिक्षक व शिक्षकेतरांची कोविड तपासणी करणे व इतर साधने उपलब्ध करून देणे यासाठी फारच कमी आहे, असे मत शाळा प्रमुख, शिक्षक आणि पालक व्यक्त करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा प्रमुख यांची सुरक्षितता विचारात घेऊनच पूर्ण तयारीनंतरच वर्ग अध्यापनास परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने पालिका आयुक्तांकडे केल्याचे परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: