शिक्षकांनाही लोकलप्रवासाची मुभाम. टा. प्रतिनिधी, मुंबई

ऐन दिवाळीत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उपनगरी रेल्वेप्रवासाचा प्रश्न निकाली निघाला आहे. या कर्मचाऱ्यांना लोकलप्रवासाची मुभा देण्याच्या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अधिकृत ओळखपत्र दाखवून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश मिळणार आहे.

दिवाळी सुट्टीनंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शहर आणि उपनगरात राहतात. त्यांना प्रवासदिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकलप्रवासाची मुभा देण्यात आली आहे, असे मध्य आणि पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई लोकलच्या सध्या ८८ टक्के फेऱ्या सुरू आहेत. अत्यावश्यक सेवेसह एकूण १७ संवर्गातील सुमारे १२ लाखांहून अधिक प्रवासी दररोज लोकलमधून प्रवास करत आहेत. राज्य सरकारने मंजूर केलेल्या प्रवासी संवर्गातील प्रवाशांव्यतिरिक्त अन्य प्रवाशांनी स्थानकात गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले आहे.

सामान्यांची लोकलप्रतीक्षा कायम

मुंबईतील सर्व महिलांसह आरोग्य, पोलिस, सफाई कामगार, महापालिका-नगर परिषद, मंत्रालय, बँका-पतपेढी, रेल्वे, प्राप्तिकर, संरक्षण, न्यायव्यवस्था या आणि अन्य संवर्गातील प्रवाशांना राज्य सरकारने लोकलप्रवासाची मुभा दिलेली आहे. मात्र सामान्य प्रवाशांची लोकलप्रतीक्षा कायम आहे. आता शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकलमुभा मिळाल्यानंतर सामान्यांना देखील लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी केव्हा मिळणार याकडे तमाम प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: