विद्यार्थ्यांनी आणली रुग्णवाहिका सेवा; IIT च्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रमम. टा. विशेष प्रतिनिधी

पवई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णसेवांवरही ताण येऊ लागला आहे. यामुळे वेळेवर रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) उपलब्ध न होण्यासारख्या विविध समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा म्हणून आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. रुग्णवाहिकेची गरज असलेल्या लोकांची अडचण सोडविण्याचा त्यांचा या माध्यमातून प्रयत्न असेल. ‘गेट हेल्प नाऊ’ असे या सेवेचे नाव आहे.

अनेकदा रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध होतेही मात्र त्याचे दर परवडणारे नसतात. काही रुग्णांना भेडसावणारी ही समस्या सोडविण्यासाठी या विद्यार्थ्यांनी स्वत:ची रुग्णवाहिका विकत घेतली. पहिल्या पाच किमी अंतरासाठी पाच हजार रुपये आकारले जाणार असून, यानंतर प्रति किमी दर लावले जातील. यामुळे दर नियंत्रणही शक्य होणार आहे. पाच रुग्णवाहिकांपुरत्या मर्यादित असलेल्या या सेवेशी सध्या ४५ अॅम्ब्युलन्स जोडल्या गेल्या आहेत. यात १५ रुग्णवाहिका या कोव्हिडसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ही संख्या आणखी वाढविण्याचा या विद्यार्थ्यांचा मानस आहे. यामुळे शहतील अन्य खासगी अॅम्ब्युलन्स सेवा पुरविणाऱ्या लोकांशी संपर्क साधत असून त्यांनाही या सेवेशी जोडून घेण्याचा त्यांचा मानस आहे.

आयआयटीतील माजी विद्यार्थी आदित्य मक्कार, शिकर अग्रवाल आणि व्यंकटेश अमृतवार या तिघांनी एकत्र येऊन ही सेवा सुरू केली आहे. ‘२०१७मध्ये दिल्लीत माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नव्हती. त्यावेळेस आम्ही त्यांना गाडीतून नेले होते. तेव्हा मला ही एक मोठी समस्या असल्याचे जाणवले’, असे आदित्य मक्कार सांगतात. मुंबईतही ही समस्या असल्याचे समोर आले. यानंतर ही सेवा सुरू करण्याचा आम्ही विचार केल्याचे ते सांगतात. हा सर्व प्रवास त्यांनी आपल्या ब्लॉगवर लिहून ठेवला आहे. सुरुवातीला त्यांना आयआयटी मुंबईतील देसाई सेठी सेंटर फॉर आंत्रप्रेनरशिपच्या माध्यमातून दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. यातून हे स्टार्टअप सुरू झाले. सध्या त्यांच्याकडे २४ आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. करोना काळात आवश्यक ती सर्व काळजी कंपनीतर्फे घेतली जात आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ८८९९८८९९५२ या नंबरवर संपर्क साधू शकता.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *