लिखाणाचा सरावच सुटला; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे समस्यामुंबई : ऑनलाइन वर्गांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण काही प्रमाणात सुरू असले, तरी शिक्षणासोबत आवश्यक असलेली कौशल्ये मात्र कमी होऊ लागली आहेत. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा लिखाण सरावच राहिला नसल्याची बाब पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या निदर्शनास येऊ लागली आहे. यामुळे परीक्षा सोप्या पद्धतीने घ्याव्यात, अभ्यासक्रमात आणखी कपात करावी, अशा मागण्या जोर धरू लागल्या आहेत. मात्र त्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती असल्यामुळे मंडळाने तीन वेळा परीक्षांचे आयोजन करावे, असे मतही काही शिक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

करोनाकाळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून सरकारने प्राप्त परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आणला. त्याप्रमाणे शिक्षण सुरूही झाले. मात्र त्याला असणारी उपस्थिती आणि उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांवर दिले जाणारे लक्ष अशा विविध बाबींबाबत संभ्रम कायम आहे. ऑनलाइन शिक्षणाचे फलित काय हे तपासण्यासाठी अनेक शाळांनी ऑनलाइन चाचण्याही आयोजित केल्या. यामध्ये बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे मूल्यमापन करून शाळांनी अध्ययन निष्पत्ती मांडली. मात्र ती पुरेशी नसल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

ऑनलाइन शिकवणे आणि शिकणे सुरू असले, तरीही त्यात लेखनसराव होतच नाही. त्यातच दहावी, बारावी परीक्षा लेखीच होणार का? की ऑनलाइन होणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. सध्या शाळांनी विद्यार्थ्यांना दिलेले ८० व ४० गुणांचे पेपरही पूर्ण लिहिता येऊ शकत नसल्याचे निरीक्षण घाटकोपर येथील केव्हीके घाटकोपर सार्वजनिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक जगदीश इंदलकर यांनी नोंदविले. जर लेखी परीक्षा झाली, तर हे विद्यार्थी नेमकी परीक्षा कशी देतील, असा प्रश्न पालकांना पडत असून हे शाळांसमोर मोठे आव्हान आहे, असेही इंदलकर म्हणाले. तर विद्यार्थी ऑफलाइन वर्गात अध्ययन करत असताना लिखाण सराव होत असतो. एप्रिल महिन्यापासून त्यांच्या हातातील पेनाची जागा कम्प्युटर किंवा मोबाइलने घेतली आहे. यामुळे लिखाण सरावच बंद झाल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष जे. के. पाटील यांनी सांगितले. यामुळे यंदा विद्यार्थ्यांना वर्णनात्मक प्रश्न प्रकारांतील उत्तरे लिहिणे कठीण होणार आहे. यामुळे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात तात्पुरता बदल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र अद्याप वेळ गेलेली नसून तीन महिन्यात विद्यार्थ्यांनी लेखन सराव केल्यास काही अंशी दिलासा मिळू शकतो, असेही पाटील म्हणाले.

तीन वेळा परीक्षा घ्यावी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा परीक्षांचे नियोजन करताना तीन किंवा चार वेळा परीक्षा घेता येतील का, याबाबत विचार करावा, अशी सूचना शिक्षणतज्ज्ञ आणि बालभारतीच्या माजी सदस्य धनवंती हर्डीकर यांनी केली आहे. यात विद्यार्थी आणि शाळांना तीनपैकी एक पर्याय निवडण्याची मुभा द्यावी. तसे झाल्यास अभ्यासाचे नियोजन करून विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील. याचबरोबर प्रशासनाला परीक्षेचे नियोजन करताना सामाजिक अंतराचे पालन करणे आदी गोष्टी सुलभ होतील, अशी सूचनाही हर्डीकर यांनी केली आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *