राज्यात हाफकिन लस उत्पादन करणार, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला पंतप्रधानांचा हिरवा कंदील


मुंबई : राज्यात हाफकिनला कोरोना लस उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल असे जाहीर केलंय. राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रोजचा आकडा 17 हजारांच्या पार गेला आहे. या वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी काही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणेकरून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंती या बैठकीत केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची सूचना लगेचच उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल असे जाहीर केले.

कोविड लसीचे हाफकिनकडून उत्पादन होणार
कोविड लसीचे हाफकिनकडून उत्पादन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली. हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोवीड सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळावी जेणेकरून लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील- फिनिश (Fill & Finish) बेसिसवर हाफकीनला काम करता येईल, यामधून 126 दशलक्ष कोविड लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात असे मुख्यमंत्री म्हणाले. यावर पंतप्रधानांनी देशात सर्वच राज्यांत अशा प्रकारे लस उत्पादनात पुढाकार घेणाऱ्या उद्योग व संस्थांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांची क्षमता 24X7 पूर्णपणे कशी वापरता येईल ते पाहण्याचे बैठकीत जाहीर केले.

दररोज 3 लाखांपर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की , लसीकरणासाठी ज्या केंद्रांची तयारी व क्षमता आहे अशा केंद्रांना किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळावी. लसीकरणासाठी महाराष्ट्रात देखील अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे पण त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे हे तपासून लसीकरण वाढविण्यात येईल. दररोज 3 लाखांपर्यंत लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

आरटीपीसीआर चाचणीबाबतही समाधान
राज्याने आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात केली असून एकूण चाचण्यांपैकी 70 टक्के चाचण्या या पद्धतीने केल्या जातात, हे प्रमाण देखील इतर राज्यांच्या तुलनेत समाधानकारक आहे असे आजच्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *