मुंबई : महाराष्ट्रात कोरोना लसीचे केवळ 14 लाख डोस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे दिवसाला पाच लाख डोस द्यायचं म्हटलं तर केवळ तीनच दिवस लस पुरणार आहे. तीन दिवसांनी महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम ठप्प होईल, अशी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दर आठवड्याला किमान 40 लाख लस पुरवठा केला पाहिजे. त्यामुळेच दिवसाला सहा लसीचं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल, असंही राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा असल्याचं समोर आलं आहे. परिणामी लसीकरण मोहीमेत अडचणी निर्माण होत आहे. एक नजर टाकूया कोणत्या जिल्ह्यात किती दिवसांचा साठा शिल्लक आहे त्यावर

मुंबईत लसीचा तुटवडा
मुंबईत लसीचा तुटवडा आहे. कोरोना लसीचा पुढचा साठा येईपर्यंत मुंबईत केवळ 1 लाख 85 हजार डोस शिल्लक आहेत. कोविशील्डचे 1 लाख 76 हजार 540 तर कोवॅक्सिनचे केवळ 8840 डोस शिल्लक आहेत. त्यामुळे कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांची अडचण होण्याचीही शक्यता आहे. प्रत्यक्षात मुंबईची गरज ही 8 ते 10 लाख डोसची गरज आहे. यापैकी 5 ते 6 लाख रिझर्व्हमध्ये साठा हवा. 5 लाखांपेक्षा कमी स्टॉक झाला तर त्याचा लसीकरण मोहिमेच्या वेगाला फटका बसतो. पुढचा साठा 15 एप्रिलला येणार असून तोही अपुराच पडणार आहे. मुंबईत 108 लसीकरण केंद्रे आहेत, तर दर दिवसाला सरासरी 50 हजार लोकांचे लसीकरण होते. लसीचा साठा मुंबईतील 108 केंद्रांवर समसमान वाटला गेला तर 1500 ते 1600 डोस सेंटरच्या वाट्याला येतात. मात्र, बीकेसीसारखे जम्बो लसीकरण केंद्र असेल किंवा खाजगी हॉस्पिटल ने पैसे भरुन जास्त लस ताब्यात घेतल्या तर लसींचा हा साठा अपुरा पडतो.

पुण्यात दोन दिवस पुरेल एवढाच साठा
पुणे जिल्ह्यातही कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यात काल 53 हजार 368 जणांनाच लस देण्यात आली. तर परवा म्हणजे सोमवारी जिल्ह्यातील 85 हजार 146 जणांना लस दिली. मात्र त्यानंतर लस अपुरी पडू लागल्याने मंगळवारी लसीकरणाचे हे प्रमाण 53 हजारांवर येऊन थांबलं. सध्या पुणे जिल्ह्यात कोरोना लसीचे 1 लाख 10 हजार डोस शिल्लक आहेत, जे जास्तीत जास्त दोन दिवस पुरु शकतील. पुणे जिल्ह्यात दररोज किमान एक लाख जणांना लस देण्याची तयारी आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली आहे. मात्र लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हे लक्ष साध्य होत नाही.

सांगलीत फक्त 15 हजार डोस शिल्लक
सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या फक्त 15 हजार एवढेच डोस प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. म्हणजेच फक्त एक दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाख जणांना लस देण्यात आली. राज्य शासनाकडे जिल्हा आरोग्य विभागाने वारंवार पाठपुरावा आणि मागणी करुनही पुरेसा पुरवठा झालेला नाही.

साताऱ्यात आज पुरेल एवढाच साठा
तर साताऱ्यातही फक्त आजच्या दिवसापुरता कोरोना लसीचा साठा शिल्लक आहे. एक दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा असल्यामुळे सर्व वैद्यकीय यंत्रणांची धाकधूक वाढली आहे. आजच्या तारखेला जिल्ह्यात 26 हजार 320 इतकाच साठा आहे. दररोज किमान 27 हजार ते 30 हजार इतका लसीचा साठा लागतो.

नांदेडमध्ये चार दिवसांचा साठा
नांदेड जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचे 64 हजार डोस शिल्लक आहेत. नांदेड जिल्ह्यात लसीकरणासाठी दर सहा दिवसाला 1 लाख डोसची गरज तर दररोज 20 हजार लसीची गरज आहे. नांदेड जिल्ह्याला 2 लाख 48 हजार 530 डोस उपलब्ध झाले तर आतापर्यंत 1 लाख 84 हजार 128 जणांचे लसीकरण झाले. सध्या 64 हजार 102 डोस शिल्लक असून पुढील 4 दिवसाचं लसीकरण होऊ शकेल.

चंद्रपुरात दोन दिवसांचा साठा
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचे 13 हजार डोस उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील रोजचा वापर 8 हजार डोस इतका आहे. त्यामुळे जिल्ह्यात केवळ 2 दिवस पुरेल इतक्या डोसचा साठा आहे. जिल्हा प्रशासनाने 1 लाख 26 हजार डोसची मागणी सरकारकडे केली आहे. चंद्रपुरात व्हेंटिलेटर बेड्सची संख्या 95 असून सध्या 79 उपलब्ध आहेत. तर ऑक्सिजन बेड्सची संख्या 146 असून सध्या 83 उपलब्ध आहेत. जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा नाही.

नागपुरात आठ दिवसांचा साठा
नागपूर शहरात 1 लाख लसीचे डोस शिल्लक आहेत. तर दिवसाला 18 हजार यानुसार लसीकरणाची क्षमता आहे. मात्र लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांची संख्या ही 11 ते 12 हजारांच्या घरात आहे. त्यामुळे शहरातील कोरोना लसीचा साठा आठ दिवस पुरु शकतो.