मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी वर्तवला आहे. ‘एबीपी माझा’सोबत केलेल्या विशेष बातचीत दरम्यान डॉ. शेखर मांडे यांनी कोरोनाची लाट थांबवण्यासाठी लसीकरण आणि नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं म्हटलं.

जगाला दिशा दाखवण्याची महाराष्ट्राकडे संधी : डॉ. मांडे
डॉ. शेखर मांडे म्हणाले की, "इतिहासात जेव्हा जेव्हा भयानक संकटं समाजासमोर उभी राहिली होती, तेव्हा महाराष्ट्राने समाजाला दिशा दाखवली होती. आज ती घडी आपल्यासमोर आली आहे. दुसरी लाट थांबवायची असेल आणि रोगाला पूर्णपणे रोखायचं असेल तर दोन गोष्टी करणं खूप आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी लस घ्यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे लसीकरणानंतरही कोरोनाविषयक नियमांचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे. हे जर केलं तर महाराष्ट्राला पुन्हा संधी आहे की जगाला दिशा दाखवायची."

सरसकट सगळ्याचं लसीकरण किती गरजेचं?
देशभरात सध्या कोरोना लसीकरण अभियान सुरु आहे. लसीकरणामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. लसीकरणाविषयी विचारलं असता डॉ. शेखर मांडे म्हणाले की, "लस घेणं सगळ्यांना आवश्यक आहे. जुने आजार असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणं आवश्यक होतं. आता 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण आवश्यक आहे. आपली उत्पादनाची क्षमता आणि उपलब्धता वाढेल तेव्हा सगळ्यांचंच लसीकरण होणं गरजेचं आहे. पण जे युवक आहेत, ज्यांचं वय 45 वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांनी सतर्कता बाळगणं, मास्क लावणं आवश्यक आहे."

कोणती लस चांगली?
कोवॅक्सिन की कोविशील्ड कोणती लस घ्यावी याविषयी अनेकांमध्ये साशंकता आहे. "भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड या दोन्ही लस चांगल्या आहेत. सरकार जी लस देईल, ती घ्यायला हवी," असं डॉ. शेखर मांडे यांनी सांगितलं.

गाफिल राहिल्याचा परिणाम
"जेव्हा भारतातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असताना, परदेशात कोरोना वाढत होता. तिथे कोरोनाची लाट आली होती. या परिस्थितीत आपण गाफिल राहिलो. यात दोष संपूर्ण समाजाचा आहे, कारण आपण त्यांच्याकडून काही शिकलो नाही. त्यांच्याकडे आकडे वाढताना आपल्याकडे आकडे कमी होणार असं आपलं मत होतं," असं डॉ. मांडे यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रातच कोरोनाबाधितांची संख्या जास्त का आहे?
दरम्यान देशभरात महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या जास्त का आहे, असेही प्रश्न विचारले जात आहेत. याबाबत डॉ. शेखर मांडे म्हणाले की, "हा गंभीर मुद्दा आहे. याचं नेमकं कारण आपल्याला माहित नाही. महाराष्ट्र मोठा प्रांत आहे. पंजाब, दिल्लीमध्ये आकडे वेगाने वाढत आहेत. दिल्ली आणि पंजाब एकत्र केल्यास महाराष्ट्राएवढा प्रांत होता. त्याचा गुणाकार केल्यास पंजाब आणि दिल्लीतील आकडे हे महाराष्ट्राएवढे आहेत. इतर कारणं पण असू शकतात. महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यासारखी मोठी शहरं आहेत. या शहरांमधील रहदारी जास्त आहे. नेमकी कारणं सांगणं कठीण आहेत, अनेक कारणं असू शकतात आणि ती बरोबरही असू शकतात."

सरकारचे निर्बंध योग्य आहेत?
"सरकार असे निर्णय घेतं, त्यामागे गंभीर विचार झालेला असतो. त्यामुळे ती शिस्त बाळगणं आवश्यक आहे," असंही मांडे यांनी स्पष्ट केलं.