मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबईतही शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदचम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले जात असतानाच, मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतला. यामुळे ठाण्यासह इतर महापालिका परिसरातही २३ नोव्हेंबरला शाळा सुरू होणार का? याबाबत दुपारी संभ्रम होता. अशातच गेल्या दोन दिवसांपासून शिक्षकांच्या करोनाचाचणी, शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याची तयारी ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असतानाच, शुक्रवारी सायंकाळी मुंबईप्रमाणेच या परिसरातही ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे येथील पालकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई महापालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांनी दिली. दिल्लीत करोनाची लाट पुन्हा आली आहे. तेथे करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार केला जात होत. अनेक पालकांचाही मुलांना करोनाकाळात शाळेत पाठवण्यास विरोध आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील नववी ते अकरावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना, स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या आदेशानुसार मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी तातडीने शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही, तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे. करोना साथीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत. तसेच नवीन वर्षात शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

आदेशाबाबत संभ्रम

मुंबई महापालिकेने शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला. याबाबत पालिका शिक्षण विभागाने निर्णय जाहीर केला. मात्र, शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अद्याप कोणतेही पत्र काढलेले नाही. यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे. मात्र, पालिकेने आदेश दिल्यामुळे उपसंचालकांनी स्वतंत्र आदेश देण्याची गरज नाही, असे सूत्रांनी सांगितले.

शिक्षक, पालकांना मानसिक त्रास

शासनाच्या निर्णयामुळे पालक व शिक्षकांमध्ये नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. शिक्षकांना चाचण्या करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. तसेच त्यांना लांबच्या रुग्णालयात जावे लागले. शिक्षकांच्या या त्रासाला जबाबादार कोण, असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत. तर पालकसभेत पालकांमध्येही संभ्रमावस्था असल्याचे निरीक्षण मुख्याध्यापकांनी नोंदविले.

पालघरमध्ये शाळा सुरू होणार

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

मुंबईप्रमाणेच ठाणे, कल्याण-डोंबिवली या परिसरात ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईमधील शाळांचे कुलूप ३१ डिसेंबरपर्यंत कायम राहणार असल्याचे शुक्रवारी रात्री स्पष्ट झाले. पालघर जिल्ह्यात मात्र सोमवारपासून पूर्वीप्रमाणे शाळा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

पालकांची संमतिपत्रे घेऊन त्यात मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले. पालघरच्या ग्रामीण भागात बहुसंख्य ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे व त्या भागात इंटरनेट सुविधा तुटपुंज्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी प्राधान्याने शाळा सुरू कराव्यात, असे आदेश आम्ही दिले आहेत, असेही ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: