महाआयटीने नेमलेल्या कंपनीचा नवा प्रताप; परीक्षा केंद्रांचा घोळम. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी येत्या रविवारी २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी विदर्भातील विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातील, तर पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विदर्भातील परीक्षा केंद्रे देण्यात आल्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. त्यातच अनेक उमेदवारांच्या दोन वेगळ्या पदांसाठीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने, त्यांना कोणतीही एकच परीक्षा देता येणार आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलून उमेदवारांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत २०१९ मध्ये ५२ पदासाठी अर्ज मागविण्यात आले. महाआयटीने निवडलेल्या आयटी कंपनीने प्रत्येक पदासाठी विद्यार्थ्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध पदांसाठी अर्ज भरले. त्यासाठी संबंधित विभागाकडून प्रत्येक पदासाठी वेगवेगळे शुल्क आकारले गेले. या परीक्षेची २०२१ मध्ये अंमलबजावणी होत असताना, सरकारने ज्या विद्यार्थ्यांनी ५ ते ६ पदांसाठी अर्ज केले आहेत, त्यापैकी फक्त दोनच अर्जांसाठी परीक्षा देता येईल असे सांगितले. पदभरती लवकर होईल, या आशेने विद्यार्थ्यांनी ही अट मान्य करून पाच-सहा अर्जांपैकी फक्त दोन अर्ज निवडले. या पदाची परीक्षा येत्या रविवारी २८ फेब्रुवारी रोजी होणार असल्याने, त्याचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये दोन पदांची परीक्षा एकाच दिवशी दोन सत्रामध्ये दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे ओणही परीक्षेसाठी एकच विद्यार्थी दोन ठिकाणी कमी कालावधीत परीक्षा केंद्रावर पोहचू शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही एक परीक्षाच देता येणार आहे. राज्य सरकारच्या या तुघलकी प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आर्थिक व मानसिक नुकसान होत असून, ते वयोमर्यादेत बाद होत आहे. त्यामुळे या प्रकारचा राज्य सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करुन, विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

परीक्षेचे नियोजन योग्य होणार का ?

विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्जात पुणे, सातारा, सांगली अशी ठिकाणे निवडली होती. मात्र, त्या विद्यार्थ्यांना गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, औरंगाबाद अकोला अशा ठिकाणी परीक्षा केंद्र मिळाले आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी अकोला, वाशिम, नागपूर अशी ठिकाणे निवडली होती, त्या विद्यार्थ्यांना सातारा, सांगली, कोल्हापूर येथील परीक्षा केंद्र मिळाले आहे. या खाजगी आयटी कंपनीला साधे प्रवेशपत्र योग्यरीत्या वितरित करता येत नसेल, तर ही खासगी कंपनी परीक्षा कशी घ्यायची याबद्दल विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे करोनामुळे पुन्हा लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत परीक्षा होणार असल्यास, विद्यार्थी मानसिक तणावाखाली जातील. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणी त्वरित मार्ग काढावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *