इंदोर : मध्य प्रदेशातील सर्व शहरी भागात कोरोनोव्हायरसच्या वाढत्या घटना लक्षात घेता शुक्रवारी संध्याकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. शहरी भागात कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दोन दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. ते म्हणाले की लॉकडाऊनला माझाच विरोध आहे, मात्र सद्य परिस्थिती लक्षात घेऊन सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. यापूर्वी छिंदवाडा, शाजापूर आणि इतर अनेक ठिकाणी लॉकडाउन लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान लसीकरण सुरुच राहणार आहे.

रुग्णालयांमध्ये बेडची संख्या 1 लाख करणार
लॉकडाऊन सोबतच मोठ्या शहरांमध्ये कंटेन्मेंट झोनही तयार करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कंटेन्मेंट झोनमध्येही लॉकडाऊन केलं जाणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की राज्यातील रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढवून 1 लाख केली जाईल. विशेष म्हणजे ऑक्सिजनच्या अभावामुळे गेल्या 48 तासांत सागर जिल्ह्यात चार तर खरगोनमध्ये एक कोरोना पेशंटचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने भिलाई स्टील प्लांटशी करार केला आहे. आतापासून दिवसाला 60 टन ऑक्सिजन पुरविला जाईल.

पाच दिवसचं सरकारी कार्यालये सुरू राहतील

कोरोनाची वाढते प्रकरणं लक्षात घेता आठवड्यातून पाच दिवस सर्व शासकीय कार्यालये उघडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत शासकीय कार्यालये सुरू ठेवली जातील. म्हणजेच, या आदेशानंतर शनिवार व रविवारी सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट
त्याचबरोबर राज्यातील कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता मुख्यमंत्री कार्यालयानेही लोकांना जाणीव करून देण्याच्या उद्देशाने ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, "साथीचा रोग लक्षात घेता फेस मास्कचा वापर अवश्य करा, सामाजिक अंतर कायम ठेवा आणि हात वारंवार स्वच्छ करा."