निकृष्ठ जेवणाविरोधात विद्यार्थ्यांच्या मोर्चाने कापले १२ कि.मी. अंतरम. टा. प्रतिनिधी,
जळगाव यावल तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित आश्रम शाळेत निकृष्ट जेवण मिळत आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी संतप्त विद्यार्थ्यांनी १२ किलो मीटर पायी प्रवास केला. इयत्ता आठवी ते दहावीच्या ३१ विद्यार्थ्यांनी मनवेल ते यावल हे अंतर पायी पार करून रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास प्रकल्प कार्यालय गाठले.

रविवारी सुटी असल्याने प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे-पाटील कार्यालयात उपस्थित नव्हत्या. मात्र, त्यांनी सहायक प्रकल्प अधिकारी एन.बी.झंपलवाल यांना विद्यार्थ्यांची तक्रार ऐकून घेण्याचे आदेश दिले. झंपलवाल यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच संस्थेचे अधीक्षक आणि शिक्षकांची कानउघाडणी केली. मुलांचा अडचणी दूर झाल्या नाहीत तर वरिष्ठांकडे अहवाल देण्याची तंबी दिली. संबंधितांवर कारवाई करून समस्या सोडवण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर विद्यार्थी पुन्हा मनवेल येथील आश्रमशाळेत रवाना झाले.

मनवेल येथील आश्रमशाळेत रविवारी सायंकाळी खिचडी तयार केली होती. ती बेचव असल्याची तक्रार करत विद्यार्थी थेट प्रकल्प कार्यालयात धडकले. विद्यार्थ्यांनी बेचव खिचडीचा नमुना अधिकार्‍यांना दाखवला. पुन्हा विद्यार्थ्यांची तक्रार येता कामा नये, असे स्पष्ट निर्देश अधिकार्‍यांनी शिक्षकांना दिले.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *