कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाच दिवसात संपूर्ण शहराचं लसीकरण, चीन सरकारचं लक्ष्य


चीन : चीनमधील रुईली शहरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण शहराचं लसीकरण करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. शहरातील 3 लाख लोकांचं पाच दिवसांच्या आत लसीकरण करण्याचं चीन सरकारचं लक्ष्य आहे. शहरात लसीकरणाची सुरुवात शुक्रवारपासून (2 एप्रिल) झाली आहे. सरकारी चॅनेलवर प्रसारित झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की,  रुईली शहरातील लोक रांगेत उभं राहून लसीकरण करुन घेत आहेत. 

रुईली शहरात मंगळवारी 16 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने जोरदार हालचाल सुरु करत संपूर्ण शहराचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाबाधित 12 लोक चीनचे नागरिक आहेत तर चार म्यानमारचे नागरिक आहेत. रुईली शहर म्यानमारच्या सीमेला लागून आहे. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा संपूर्ण शहराचं लसीकरण

लोकांना होम क्वॉरंटाईन राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील इतर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्यानमारमधून घुसखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण शहराचं लसीकरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रव्यापी लसीकरण जोरात सुरु असताना चीन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

चीनमध्ये आतापर्यंत 90 हजार 217 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4636 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे जगभरात 13 कोटी हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांची संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. जगभरात विविध देशांमध्ये कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. 

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *