औरंगाबादच्या राशी जाखेटेला फ्रान्समध्ये स्कॉलरशिपम. टा. प्रतिनिधी,

फ्रान्सच्या शिक्षण मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या आयफेल एक्सलन्स स्कॉलरशिपसाठी औरंगाबादच्या राशी हरीश जाखेटे हिची निवड झाली आहे. ती अॅथलेटिक्समधील राष्ट्रीय पदकविजेती आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनातील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ती लवकरच फ्रान्सला रवाना होईल.

जगभरातील हुशार विद्यार्थ्यांनी फ्रान्समध्ये येऊन उच्चशिक्षण घ्यावे, या उद्देशाने फ्रान्स सरकार काही निवडक विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती देते. त्यासाठी फ्रान्समधील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून नामांकने मागवली जातात. त्यातील विविध विषयात अष्टपैलू शैक्षणिक कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या राशीने फ्रान्सच्या टूर्स शहरातल्या ‘एक्सिलिया ग्रुप ला रॉशेल बिझनेस स्कूल’ या महाविद्यालयात ‘एमएस्सी इन इंटरनॅशनल टुरिझम अँड डेस्टिनेशन मॅनेजमेंट’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयाने तिचे नाव या शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाकडे पाठवले होते. विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांतून आलेल्या अर्जांची छाननी करून ही नामांकने शिक्षण मंत्रालयाकडे केली. त्यातूनच दीड वर्षांच्या या अभ्यासक्रमासाठी तिला ही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.

पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून इतिहास विषय घेऊन बीएची पदवी मिळवलेली राशी अष्टपैलू खेळाडू आहे. अॅथलेटिक्सच्या विविध क्रीडाप्रकारांत तिने राष्ट्रीय पातळीवर पदके मिळवली आहेत. चीनच्या वुहान शहरात २०१४-१५ साली झालेल्या वर्ल्ड स्कूल गेम्समध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असल्याचे वडील हरीश आणि आई सीमा जाखेटे यांनी सांगितले.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *