एमबीबीएस विद्यार्थी करोना लढ्यात होणार सहभागी?वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, सैन्यदलांसह विविध विभाग, संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून करोनास्थितीचा आढावा घेतला. प्रभावी मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी वैद्यकीय आणि नर्सिंगच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, विविध बैठकांत झालेल्या चर्चेंच्या अनुषंगाने, सरकार सोमवारी अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

देशाच्या अनेक भागांत बाधितांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याचे विविध बैठकांत पंतप्रधानांना सांगण्यात आले. लष्कराने अनेक ठिकाणी तात्पुरती रुग्णालये सुरू केली असून त्यात जिथे शक्य आहे तिथे सर्वसामान्यांवरही उपचार केले जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. ‘नीट’ पुढे ढकलणे, ‘एमबीबीएस’ उत्तीर्ण झालेल्यांची मदत घेणे आदींवर चर्चा झाली.

ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा वाढविण्यासाठी नवे पर्याय शोधण्याचे निर्देश पंतप्रधानांनी नयापूर्वी दिले होते. त्याचा आढावाही रविवारी घेण्यात आला. पोलाद प्रकल्प, पेट्रोकेमिकल प्रकल्पांसह अन्य उद्योगांमध्ये असलेल्या ऑक्सिजनचा वैद्यकीय उपचारांसाठी वापर करण्यावरही चर्चा झाली. ज्या कंपन्यांत असे ऑक्सिजन प्रकल्प आहेत, तिथेच ऑक्सिजनयुक्त खाटा असलेली तात्पुरती पाच कोविड केअर सेंटर उभारली जात आहेत. त्याप्रमाणे त्याची संख्या वाढविता येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही सुविधा कार्यान्वित केली तर, अशा प्रकल्पांजवळ तात्पुरती रूग्णालये उभारणे सहज शक्य आहे. त्यातून कमीतकमी वेळेत दहा हजार ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध होतील, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. पंतप्रधानांचे मुख्य सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, रस्ते वाहतूक व महामार्ग सचिव व अन्य वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.


Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *