दिल्लीचे शिक्षण संचालक आणि २००७ च्या बॅचचे आयएएय अधिकारी (IAS) उदित प्रकाश राय (Udit Prakash Rai) बोर्ड परीक्षांच्या आधी विद्यार्थ्यांशी संवाद साधायला एका शाळेत पोहोचले. तेथे एका विद्यार्थ्याने त्यांना विचारले की, ‘जर आम्हाला कुठल्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, तर काय करायचं?’ त्यानंतर त्यांनी सांगितले की त्यांना काय करायचं आहे. ते म्हणाले, ‘परीक्षेत कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मोकळं सोडायचं नाही. काहीही लिहा. जे येते, जे आठवते ते लिहा. जर काहीच येत नसेल तर तो प्रश्नच पुन्हा उत्तरात लिहा. पण उत्तराची जागा मोकळी सोडू नका. आम्ही तुमच्या शिक्षकांशी बोललो आहोत. सीबीएसईशी देखील आमचं बोलणं झालं आहे. आम्ही त्यांना सांगितलंय की मुलांनी परीक्षेत काहीही लिहिलं, तरी त्यांना गुण मिळणार.’
या व्हायरल व्हिडिओनंतर विरोधी पक्षांनी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीवर टिकेची झोड उठवली आहे. भाजप दिल्ली प्रदेश अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना टॅग करत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि लिहिलंय की आम आदमी पार्टी दिल्लीतील मुलांच्या भविष्याशी खेळू शकत नाही.
अनेक शिक्षकांनी देखील या व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टींबाबत टीका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की अभ्यास करणारे विद्यार्थी आणि सद्यस्थितीतली सिलॅबस पूर्ण करण्याची तारेवरची कसरत शिक्षक करत आहेत, अशावेळी अशा गोष्टी नकारात्मकता पसरवणाऱ्या आहेत. शिक्षकांना थेट सांगितलं जातंय की विद्यार्थ्यांनी काहीही लिहिलं तरी त्यांना पास करा.