आरटीई प्रवेशाची सोडत जाहीरम. टा. प्रतिनिधी, मुंबई

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणारी आरटीई सोडत बुधवारी जाहीर झाली. येत्या १५ एप्रिलपासून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवली जाणार आहे. प्रवेश मिळूनही पडताळणी समितीशी संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करावा, असेही आवाहन संचालनालयाने केले आहे. आरटीई प्रवेशासाठी पालकांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लॉटरी काढण्यात आली. शिक्षण विभागाने ऑनलाइन सोडतीची प्रक्रिया सुरू केली असून, दोन दिवसानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे कोणाला प्रवेश मिळणार हे पाहण्यासाठी येत्या १५ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पालकांनी केवळ मोबाइलच्या एसएमएसवर अवलंबून राहू नये. आरटीई पोर्टलवर प्रवेशअर्जाचा क्रमांक टाकून पालकांनी प्रवेशाची स्थिती जाणून घ्यावी, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, औदुंबर उकिर्डे, गीता जोशी, सुरेखा खरे, पुणे मनपा आरटीई समन्वयक वैशाली पांढरे, शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना आरटीईच्या पोर्टलवर जाहीर होतील.

पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करावी

सोडतीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, काही कारणास्तव पालक बाहेरगावी असतील, तर त्यांनी समितीशी ई-मेलद्वारे किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधावा. प्रवेश मिळूनही संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. त्याचप्रमाणे एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश लॉटरीतून प्रवेश मिळाला तरीही रद्द करण्यात येणार आहे. प्रतीक्षायादीतील पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊ नये, असे टेमकर यांनी सांगितले.

आरईटीई प्रवेश तपशील

एकूण शाळा – ९,४३२

प्रवेशक्षमता – ९६,६८४

एकूण अर्ज – २,२२,०२८

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *