अतिरिक्त शुल्क आकारणी: ५० शिक्षण संस्थांना शुल्क नियामक प्राधिकरणाची नोटीसम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

अतिरिक्त शुल्क आकारणीबाबत राज्यातील ५० खासगी शिक्षण संस्थांना शुल्क नियामक प्राधिकरणाने नोटीस पाठवली आहे. यातील बहुतांश संस्था या वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आहेत, तर या संस्थांनी आकारलेल्या अतिरिक्त एक ते दोन लाखाबद्दल यामध्ये स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. तसेच काही शिक्षण संस्थांनी शुल्कआराखडा वेबसाइटवर प्रसिद्ध केला नव्हता, याबाबतही स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

बहुतांश वैद्यकीय शिक्षण संस्थांनी शुल्कामध्ये ‘कॉशन मनी’च्या नावाखाली दोन लाख रुपये आकारले आहेत. याचबरोबर ग्रंथालय अनामत रक्कमही २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत आकारण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर प्रयोगशाळा, हॉस्टेल, जिमखाना अनामत रक्कमही शुल्कात दाखविण्यात आली आहे. करोनाकाळात या सर्व सुविधांचा वापर विद्यार्थ्यांनी केला नाही. यामुळे या शुल्कआकारणीला काहीच अर्थ उरत नाही. याचबरोबर ग्रंथालय अनामत रक्कम ही कॉलेजांसाठी एक प्रकारचे उत्पन्नच ठरत आहे. अनेक विद्यार्थी ती परत घेत नसल्याने ते सर्व पैसे तिजोरीत जमा राहतात. इतकेच नव्हे, तर एका कॉलेजने ‘अॅकॅडमिक क्लब’ या नावाने तब्बल एक लाख रुपयांची अनामत रक्कम शुल्कात दाखविली आहे. प्रयोगशाळा शुल्क ४० हजार, तर हॉस्टेलसाठी ७५ हजार रुपये आकारले जात आहे. एका कॉलेजने तर २.३ लाख रुपये वेगवेगळ्या प्रकारची अनामत रक्कम म्हणून विद्यार्थ्यांकडून वसूल केली आहे. हा सर्व प्रकार प्राधिकरणाच्या बैठकीत समोर आल्यानंतर अशा कॉलेजांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक संस्था अधिनियम, २०१५नुसार ‘कॉशन मनी’बाबत काहीही म्हटलेले नाही. तरीही व्यवस्थापन आणि वैद्यकीय शिक्षण संस्था सर्रास या शुल्काची आकरणी करत आहेत. काही कॉलेजे अगदी आवश्यक ते शुल्क घेऊन चांगल्या प्रकारे शिक्षण संस्था चालवितात. तर इतर संस्थाही अशा प्रकारे शिक्षण संस्था का चालवू शकत नाहीत, असा सवाल एका अधिकाऱ्याने उपस्थित केला. तर प्राधिकरणांच्या नोटीसला उत्तर देताना, अनामत रक्कम व्यवस्थापनाने अंतिम केल्याचे संस्थांनी कळविले आहे.

अतिरिक्त शुल्कआकारणी

– काही कॉलेजांची ‘कॉशन मनी’च्या नावाखाली दोन लाख रुपये शुल्क आकारले.

– ग्रंथालय अनामत रक्कमही २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत घेतली.

– प्रयोगशाळा, हॉस्टेल, जिमखान्याची अनामत रक्कमही शुल्कात दाखविली.

– अनेक विद्यार्थी फी परत घेत नसल्याने ग्रंथालय अनामत रक्कम कॉलेजांसाठी उत्पन्नाचे साधन ठरत आहे.

– एका कॉलेजने ‘अॅकॅडमिक क्लब’ नावाने एक लाख रुपयांची अनामत रक्कम शुल्कात दाखविली.

– प्रयोगशाळा शुल्क ४० हजार, तर हॉस्टेलसाठी ७५ हजार रुपये आकारले.

– एका कॉलेजने २.३ लाख रुपये वेगवेगळ्या प्रकारची अनामत रक्कम म्हणून विद्यार्थ्यांकडून वसूल केली.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *