अकरावी प्रवेश: लाखभर जागा रिक्त आणि २५ हजार विद्यार्थी प्रवेशाविना!म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

अकरावीच्या तीन फेऱ्या आणि एक विशेष फेरी पार पडल्यानंतरही तब्बल एक लाख सात हजार ३६ इतक्या जागा रिक्त राहिल्या आहेत. पहिल्या विशेष फेरीत प्रवेशासाठी कॉलेज अॅलॉट झालेल्या सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला. यामुळे सुमारे २५ हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून दूर आहेत. या विद्यार्थ्यांसाठी आता दुसरी विशेष फेरी होणार असून यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही यादी ५ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी यंदा असलेल्या तीन लाख २० हजार ३९० जागांसाठी दोन लाख १२ हजार १५२ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीअखेर अर्ज दाखल केले होते. यानंतर तीन नियमित फेऱ्या आणि त्यानंतर एक विशेष फेरी आणि कोट्यातील प्रवेश ४३ हजार ७२३ असे मिळून आतापर्यंत एक लाख ८२ हजार १४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामुळे तब्बल एक लाख ७ हजार ३६ जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांवर आणि प्रवेशापासून अद्यापही वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी दुसरी विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे.

या फेरीला १ जानेवारीपासूनच सुरुवात झाली आहे. या फेरीत आता पुरवणी परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना ४ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर ५ जानेवारी रोजी ६ वाजता यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालकांनी दिली आहे. दुसऱ्या विशेष फेरीदरम्यान द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थी पसंतीनुसार कॉलेजांत अर्ज करू शकणार आहेत. ५ जानेवारीला दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी प्रदर्शित करताना कॉलेजांना द्विलक्षी विषयासाठी आलेल्या अर्जानुसार निवड यादी तयार करून प्रसिद्ध करायची सूचना शिक्षण संचालनालयाने दिली आहे. ६ ते ८ जानेवारी दरम्यान दुसऱ्या विशेष फेरीदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

फेऱ्यांनुसार असे झाले प्रवेश

शाखा — पहिली — दुसरी — तिसरी– विशेष १ — शिल्लक जागा

कला — ६,६२२ — २,९२० — १,२६३ — ३,६०४ — १४,१६३

वाणिज्य — २५,६१७ — १५,९६० — ८,४७९ — २५,१६५ — ५५,१६५

विज्ञान — १९,४९४ — ८,४५३ — ४,०२३ — १५,०६४ — ३४,६३१

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *